अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकली. पोलिसांच्या धाडीत तब्बल 28 जुगारींना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींमध्ये अकोट नगरपालिकेतील तीन नगरसेवकांसह एका नगरसेविकेच्या मुलाचा समावेश आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी ही कारवाई केली.


अटकेतील जुगारी नगरसेवकांमध्ये मुख्तार रवान अय्युब खान, सलीम नबीउल्ला खान, आरिफ मारुफ यांच्यासह नगरसेविकापुत्र मनोज चंदन यांचा समावेश आहे. तर जितेंद्र चंडालिया हा माजी नगराध्यक्षांच्या कुटुंबातील आहे. याशिवाय इतर आरोपींमध्ये अकोला, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातील काही मोठ्या व्यापाऱ्यांचा समावेश आहे.

अकोट शहरातील अंजनगाव मार्गावरील माऊली मनोरंजन केंद्रावर हा गोरखधंदा सुरु होता. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास सुरु झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत चालली. या कारवाईत पोलिसांनी 50 हजारांच्या रोख रकमेसह सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फरार झालेल्या इतर आरोपींच्या अटकेनंतर जुगारी आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.