Maharashtra : महिन्याभरापूर्वी आपत्कालीन कोविड पॅरोल संपल्यानंतर तुरुंगात परत हजर न झालेल्या कैद्यांची संख्या 892 इतकी आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या 892 कैद्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे राज्याच्या तुरुंग विभागाने हजर न झालेल्या कैद्यांवर नवीन गुन्हे नोंदविण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत 86 फरार कैद्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. 


कायदा आणि सुव्यवस्था शाखा गुन्हे शाखेचे प्रमुख असलेल्या दोन्ही सह पोलीस आयुक्तांना या कैद्यांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा कारागृहात आणण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याच्या सूचना  दिल्या आहेत. 


महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल रोजी आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत लागू केलेले सर्व निर्बंध मागे घेतल्यानंतर, राज्याच्या गृह विभागाने 4 मे रोजी सर्व दोषी कैद्यांना कारागृहात परत येण्याचे निर्देश देऊन तात्पुरत्या पॅरोलबाबत आदेश जारी केला. जे कैदी परत आले नाहीत त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 224 (कायदेशीर कोठडीला विरोध करणे) अंतर्गत खटले नोंदवण्याचे निर्देशही गृह विभागाने तुरुंग विभागाला दिले आहेत.


या आदेशानंतर कारागृह विभागाने तातडीच्या पॅरोलचा लाभ घेतलेल्या सर्व कैद्यांच्या पॅरोल स्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली. 3,340 कैदी निर्धारित वेळेत कारागृहात परतले आणि जे परत येऊ शकले नाहीत, त्यांना संबंधित पोलीस ठाण्याला कळविण्यात आले.


पॅरोलवर असलेला कैदी रडारच्या बाहेर गेला तर  तुरुंग कर्मचारी त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करू शकतात. कोविडमुळे तत्काळ पॅरोल देण्यात आलेल्या  कैद्यांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण पॅरोल संपल्यानंतर हजर देखील झाले आहेत. मात्र, 892 कैदी अद्याप हजर झाले नाहीत.


महत्वाच्या बातम्या :