मुंबई : मुंबईतून पुणे आणि नाशिकचा प्रवास लवकरच लोकलद्वारे करता येणार आहे. वामन सांगळे या रेल्वे कर्मचाऱ्याने पंतप्रधान जनता शिबिरात हा प्रस्ताव मांडला होता. मध्य रेल्वेच्या इगतपुरी स्थानकात मुख्य लोको निरीक्षक म्हणून ते काम करतात. रेल्वे प्रशासनाने या प्रस्तावाचा विचार करुन नियोजन केल्यास मुंबईतून पुणे आणि नाशिकला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
काय आहेत सूचना :
1 . मुंबई ते नाशिक तसेच मुंबई ते पुणे लोकल धावु शकेल. सध्या मेल आणि एक्सप्रेस गाड्या या मार्गांवर धावत आहेत. फक्त कल्याण,कसारा किंवा लोणावळा इथे लोकल बदलावी लागेल.
2 . डीसी- एसी परिवर्तन झाल्याने गाड्यांचा वेग वाढला आणि नविन ब्रेक असलेले इंजिन आणि गाड्या वापरात आल्या आहेत. मेल एक्स्प्रेससाठी कसारा घाटात 24 डब्यांच्या गाडीला बँकर इंजिन बदलावे लागते. यात तब्बल ४० मिनिटांचा वेळ वाया जातो. त्यापेक्षा नव्या गाड्यांचा वापर करून दोन्ही बाजूला मोटरमन दिल्यास पुश थ्रूच्या माध्यमातून चालकाच्या सिग्नलवर मागच्या दिशेकडील मोटरमन गाडी मार्गस्थ करू शकेल. यामुळे हा ४० मिनिटांचा वेळ आणि ४ बँकर इंजिन रिक्त होतील.
या दोन्ही सूचना मध्य रेल्वेवर आधीच अंमलात आणण्यात आल्या आहेत आणि त्या वामन सांगळे यांनी स्वतः यशस्वीरित्या करून देखील बघितल्या आहेत. फक्त त्या मेंटेनंस, शंटिंग आणि इतर कारणासाठी वापरल्या जातात. हा पर्याय नियमित वाहतुकीसाठी वापरला तर यामुळे रेल्वेलाच कोट्यावधींचा फायदा होणार आहे. तसंच मनुष्य बळ आणि वाहतूक वेळ देखील वाचणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी देखील या सूचनांची दखल घेतली आहे. तसंच सांगळे यांना लवकरच प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.