मुंबई : भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या कार्यक्रमात सेनेच्या राड्यानंतर आणखी 8 शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली आहे. काल रात्री मुलुंडमधून या शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आलं.
दसऱ्यादिवशी सोमय्यांच्या कार्यक्रमात राडा केल्याप्रकरणी आतापर्यंत एकुण 13 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान अटक केलेल्या ५ शिवसैनिकांची पोलीस कोठडी आज संपणार असून त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
मुलुंडमधील राड्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांची उणी-धुणी काढायला सुरुवात केली आहे. "मुलुंडमध्ये महापालिकेतील भ्रष्टाचाराचा रावण दहन हा भाजपचा अधिकृत कार्यक्रम होता. सुरुवात त्यांनी केली आहे, अंत आम्ही करु," असा इशारा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिला आहे. तर शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हेंनी भाजपशी संबंधित कंपन्यांच्या तथाकथित घोटाळ्यावर बोट ठेवत सोमय्यांवर निशाणा साधला आहे.
मुलुंडमधल्या रावणदहनाच्या कार्यक्रमात भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी भाजपनं केली आहे. भाजपच्या मंत्र्यांनी आणि खासदारांनी मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकरांची भेट घेतली. यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांसह प्रकाश मेहता, गोपाळ शेट्टी , मनोज कोटक आणि राज पुरोहित आदी नेते उपस्थित होते.