मुंबईकरांचा एसी लोकलचा प्रवास लांबण्याची चिन्हं
एबीपी माझा वेब टीम | 13 Oct 2016 07:59 AM (IST)
मुंबई : मुंबईकरांचा एसी लोकलचा प्रवास लांबण्याची चिन्हं आहेत. एप्रिल महिन्यात मुंबईत दाखल झालेल्या एसी लोकलच्या अद्याप चाचण्या न झाल्यामुळे मुंबईकरांना एसी लोकलसाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या ताफ्यात एप्रिलमध्ये एसी लोकल दाखल झाली आहे. कुर्ला कारशेडमध्ये सध्या ही एसी लोकल ठेवण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत एसी लोकलच्या चाचण्या सुरु होतील. यात सर्वात आधी कारशेडमधील चाचण्यांना एसी लोकलला सामोर जावं लागणार आहे. एसी लोकलच्या जवळपास 30 पेक्षा जास्त चाचण्या होणार आहेत. रेल्वेमार्ग आणि कारशेडमध्ये या चाचण्या घेण्यात येतील. एसी लोकलच्या सर्व चाचण्यांना जवळपास 6 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यात कारशेडमधील जवळपास 15 चाचण्या आणि रेल्वेमार्गावरील 18 चाचण्यांचा समावेश असेल. या चाचण्या कल्याण-कर्जत आणि कसारा-कुर्ला मार्गावर घेण्यात येतील. एसी लोकलच्या चाचण्यांमध्ये वळणावर गाडीची स्थिती, विद्युत पुरवठा, वातानुकूलन प्रणाली, ऑटोमेटिक दरवाजे, ब्रेक सिस्टीम आदी गोष्टींची नोंद ठेवली जाणार आहे. दरम्यान भारतात बनवलेल्या या एसी लोकलसाठी जवळपास 54 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.