नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट  असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामाला अखेर सुरवात झाली आहे. दहा जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गाच्या भूसंपादनाला नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला होता. त्यांना पाचपट मोबदला देऊन विकासाचा महामार्ग म्हणून ज्याचे प्रमोशन केलं जात आहे, त्याच समृद्धी महामार्गाच्या कामाला काही दिवसांपासून सुरवात करण्यात आली आहे.


नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात मोठमोठ्या मशिनरी, गाड्या, मोठ्या संख्येने कामगार दाखल झाले आहेत. सपाटीकरण, रस्त्याचे मार्किंग, मशिनरी जोडणे, मुरुम टाकून कच्चा रस्ता बनविणे अशा वेगवेगळ्या कामांना सुरवात करण्यात आली आहे. तसंच वावी आणि गोंदे या दोन गावांच्याजवळ जंक्शन तयार करण्यात आले आहे. अडीच वर्षात महामार्गाचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन जलदगतीने कामाला सुरुवात झाली आहे.

समृद्धी महामार्ग हा एकूण 701 किमीचा महामार्ग आहे. शिव मडका ते वडपे यादरम्यान महामार्गाचं काम टप्याटप्याने सुरु होणार आहे. नागपूर-मुंबई दृतगती शीघ्र संचार मार्ग या नावे सध्या हा मार्ग ओळखला जात आहे. नाशिकसह राज्यभरातील 10 जिल्ह्यातून या रस्त्याचा मार्ग असेल.

नाशिकच्या सिन्नर आणि इगतपुरी या दोन तालुक्यातच महामार्गाची 101 किलोमीटरची लांबी आहे. त्यासाठी सिन्नर तालुक्यातील 26 तर इगतपुरी तालुक्यातील 23 गाव आणि दहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांचं 929.64 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. इगतपुरी तालुक्यात 40 किलोमीटर तर सिन्नरमध्ये 61 किलोमीटर लांबीचा महामार्ग जाणार आहे. 120 मीटर रुंद हा रस्ता असेल.

सहा पदरी महामार्गाचा डिझाईन स्पीड लक्षात घेऊन रस्त्याचे काम सुरू झालं आहे. रस्त्याला कुठेही शार्प टर्न येणार नाहीत, सहज वळण घेता येईल अपघात होणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे.

शेतकऱ्यांचा विरोध

समृद्धी महामार्गाचे काम सुरु झाल्याच्या सुरवातीलाच वावी गावाजवळील काही शेतकऱ्यांनी एका टप्प्यातील काम बंद पाडलं आहे. परिसरसतील 6 ते 7 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या दुशिंगपूर बंधाऱ्याच्यामधून हा महामार्ग जातो. शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना बंधाऱ्याला बाधा पोहोचणार नाही, असा दावा प्रशासनाने केला होता. मात्र आता भराव टाकून बंधाऱ्यातूनच रस्ता बनविण्याचे काम सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी आक्षेप घेत काम बंद पाडलं आहे.

बंधाऱ्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्यात त्यांचे निवाडे अद्याप बाकी आहेत, समृद्धी महामार्गाला जमिनी दिलेल्या 100 हून अधिक हेक्टरचा मोबदला अद्याप मिळाला नाही. हा निवाडा पूर्ण होण्याआधीच कामाला सुरुवात करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.