नवी दिल्ली : अमेरिकेतील हॅकर सय्यद शुजा याने ईव्हीएमसंबंधी भाजपवर केलेल्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. भाजपकडून केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेत सय्यद शुजाने केलेले आरोप खोडून काढले आहे. रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवरही निशाणा साधला.


लंडनमधील पत्रकार परिषद ही काँग्रेसशी संबधित असलेल्या लोकांनी आयोजित केल्याचा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. आशीष रे यांनी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. आशीष रे यांचे काँग्रेसशी संबंध असून ते सोशल मीडियावर सातत्याने भाजपविरोधी प्रचार करत असतात, असं रविशंकर प्रसाद म्हणाले.


ईव्हीएमबाबत आरोप करणाऱ्या सय्यद शुजाविषयी बोलताना रविशंकर प्रसाद म्हणाले की, शुजा खुप मोठे आयटी प्रोफेशनल आहेत. मी साडेचार वर्ष देशाचा माहिती आणि प्रसारण मंत्री आहे, मात्र मी कधी शुजा यांचं नाव ऐकलं नाही. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला शुजा ईव्हीएम हॅक करुन दाखवणार असं सांगण्यात आलं होतं. मात्र ते चेहरा झाकून पत्रकार परिषदेला का आले, असा प्रश्न रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला.


काँग्रेसने या प्रकरणातून देशातील 90 कोटी मतदारांचा अपमान केला आहे. विदेशात बसून भारताला बदनाम करण्याचा हा डाव आहे, असा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला.


गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत केलेल्या दाव्यावर बोलताना रविशंकर प्रसाद म्हणाले की, शुजा बकवास करत आहे. गोपीनाथ मुंडे आज आपल्यात नाहीत. त्यामुळे त्यांच्या नावाचा आधार घेत आपला खोटेपणा लोकांसमोर मांडला जात आहे, असं रविशंकर प्रसाद म्हणाले.


सय्यद शुजाचे आरोप


लंडनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सय्यद शुजा या हॅकरने अत्यंत खळबळजनक आरोप केले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन) हॅक करण्याचं तंत्र आपल्याकडून आत्मसात केल्याचंही हॅकरने म्हटलं आहे. त्यामुळेच निवडणुकांमध्ये भाजपला बंपर विजय मिळाल्याचं हॅकरने सांगितलं.


ट्रान्समीटरच्या सहाय्याने ईव्हीएममध्ये हॅकिंग शक्य असल्याचंही शुजाने सांगितलं. आपली 14 जणांची टीम होती, मात्र त्यापैकी काही जणांची हत्या झाल्याचा दावाही हॅकरने केला. यापूर्वी आपल्यावर हल्ल्याचे प्रयत्न झाल्यामुळे आपण अमेरिकेत शरणागती पत्करल्याचं हॅकर सय्यद शुजाने सांगितलं.


2014 मधील लोकसभा निवडणुकांच्या वेळी गोपीनाथ मुंडेंनी आपल्याशी संपर्क साधला होता, असा दावा सय्यद शुजाने केला. गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅक केल्याची माहिती होती. मुंडे ही बाब जगजाहीर करण्याच्या भीतीनेच भाजपमधील काही नेत्यांनी त्यांची हत्या घडवून आणली, असा दावा सय्यद शुजाने यावेळी केला.


गोपीनाथ मुंडे यांचं राजधानी दिल्लीत कार अपघातामध्ये निधन झालं होतं. 3 जून 2014 रोजी दिल्ली विमानतळावर जाताना त्यांच्या गाडीला एका वेगवान कारने धडक दिली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुंडेंना तातडीने 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आलं, मात्र कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली होती.


संबंधित बातम्या


ईव्हीएम हॅकिंगमुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, हॅकरचा दावा


EVM सुरक्षित, कायदेशीर कारवाईचा विचार : निवडणूक आयोग


गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची 'रॉ'मार्फत चौकशी व्हावी : धनंजय मुंडे