Mumbai: बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना (BEST Contract Workers) मागील काही महिन्यांपासून पगारच नसल्यानं त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. याच पार्श्वभूमीवर बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी येत्या पाच तारखेपर्यंत न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय. याच दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनानं (MNS) बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाजूनं कंबर कसली असून प्रशासनाला पाच सप्टेंबरपर्यंत अल्टीमेटम दिलंय. तसेच या कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांना कॅबिनमध्ये बसू न देण्याचा इशाराही मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी दिलाय. 


लोकेश चंद्रांना केबिनमध्ये बसू न देण्याचा इशारा
"बेस्ट भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. पाच डेपोचे कंत्राटी कामगार आमच्याकडे आले आहेत. या कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षभरापासून पगार नाही. परिणामी, यापैकी एका कामगारानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. सण तोंडावर आहे कर्मचाऱ्यांकडं पैसा नाही. बेस्टनंज्यांच्या बरोबर करार केला आहे, त्या कंपन्या कामगारांचा पैसा देत नाहीत. कंत्राटी कामगारांना नियुक्त करताना या कंपन्यांनी या कामगारांकडून वीस हजार रुपये घेतले आहेत. बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा लक्ष देत नाहीयेत. यापूर्वी आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे. आम्ही त्यांना पाच सप्टेंबरपर्यंत अल्टीमेटम देत आहोत. सहा सप्टेंबरला आम्ही लोकेश चंद्रा यांना त्यांच्या केबिनमध्ये बसू देणार नाही", असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिलाय.


आदित्य ठाकरेंवर टीका
"शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांना लाज वाटली पाहिजे. मराठी कर्मचाऱ्यांची उपासमार होतेय. गुजराती कंपन्यांना यांनी कंत्राट दिलेच कसं? मातोश्रीनं बेस्टचे कंत्राट गुजराती कंपन्यांना दिलं आहे. मराठीचा पुळका आणता मग मराठी कर्मचाऱ्यांना न्याय का देत नाहीत. मढ प्रमाणे माहीम मध्ये ही अनधिकृत लाकडी वाखारी उभारण्यात आले आहेत. बीपीटी आणि कलेक्टर जमिनीवर या वखारी उभारण्यात आल्या आहेत. यासंदर्भात न्यायालयात याचिका देखील आहे. मुंबई महापालिकेने अद्याप यांच्यावर कारवाई का केली नाही?" असा प्रश्नही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलाय.


बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मांडली व्यथा
"बेस्ट मध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करत असलेले ड्रायव्हर आणि कंडक्टरवर अन्याय होतोय. तीन महिन्यापासून पगार नाही, त्यामुळं अनेक समस्यांना सामोरे जावे लागतंय. सणवार तोंडावर आहे ते साजरे करायला देखील पैसे नाहीत. उदरनिर्वाह कसा करायचा हे देखील कळत नाही. यामुळं काही कर्मचारी आत्महत्येचा प्रयत्न करत आहेत. याला सर्वस्वी जबाबदार बेस्टचा कंत्राट घेतलेली कंपनी आणि प्रशासन आहे. येत्या पाच तारखेपर्यंत न्याय मिळाला नाही तर आम्ही आंदोलन करणार", असा इशारा बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिलाय.


हे देखील वाचा-