Sangli Crime Update:  सांगली शहरात (Sangli City) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आपल्या सवतीच्या तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण करून  त्याला बिहारला (Bihar) पळवण्याचा प्रयत्न करणारी घटना उघडकीस आली आहे. मात्र तात्काळ सांगली शहर पोलिसांनी अपहरणाचा डाव उधळून लावत मुलाची सातारा रेल्वे स्थानकावर सुखरूप सुटका केली आहे. मुलाला पळवून नेणार्‍या पहिल्या पत्नीसह चौघांना गजाआड करण्यात आले आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील शामसुंदर रवीदास याने पहिली पत्नी बिहारमधील महूयत (ता. धरेया जि. गया) येथे असताना सांगलीतील हॉटेलमध्ये काम करणारी महिला वैशाली हिच्याशी लग्न केले होते. पतीला परत नेण्यासाठी पत्नी रेशमी देवी, तिचे भाऊ बुदन, मिथुनकुमार आणि आई वासंतीदेवी हे चौघेजण सांगलीत आले होते. 


गुरूवारी दुसरी पत्नी वैशाली हिच्यासोबत  वादावादी झाली. या वादावादीची तक्रार देण्यासाठी दुसरी पत्नी वैशाली ही शहर पोलीस ठाण्यात गेली असता पोलीस ठाण्याच्या आवारातून तीन वर्षाचा मुलगा सुजीत याचे अपहरण केले. या प्रकरणी पोलीसांना माहिती देताच निरीक्षक अभिजित देशमुख यांनी तातडीने हालचाली करीत पोलीस पथक संशयितांच्या शोधासाठी पाठविले. संशयित अपहृत मुलासह महाराष्ट्र एक्सप्रेसने बिहारला रवाना झाल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी तातडीनं पावलं उचलली.


पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय सुतार, संदीप पाटील, धनाजी शिंदे, अभिजित माळकर आदींनी कराड आणि सातारा येथे संशयितांना पकडण्यासाठी आणि मुलाची सुटका करण्यासाठी सापळा लावला. सातारा रेल्वे स्थानकावर या संशयितांना सातारा पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. मुलाचीही सुखरूप सुटका करण्यात आली.


मुलाला ताब्यात घेतल्यानंतर त्याला आईच्या हवाली करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अपहरण केल्या प्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळं तीन वर्षाच्या मुलाचं होणारं अपहरण वाचलं. यामुळं मुलाच्या आईनं पोलिसांचे आभार मानले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या