Mumbai Maharashtra Rain Update : राज्यातील बहुतांश भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. राज्यात कोल्हापूर, अकोला, परभणीसह अनेक ठिकाणी पूरस्थिती असून अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत. पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज आणि उद्या मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुण्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीचा तर कोल्हापुरातल्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यात देखील पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातल्या नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे.


मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.  कसारा घाटात रेल्वे रुळावर दरड कोसळल्यानं लांबपल्ल्याच्या गाड्या रखडल्या आहेत. कसारा  बाजूच्या ट्रेन टिटवाळ्यापर्यंत चालू आहेत तर कर्जत बाजूच्या गाड्या अंबरनाथपर्यंत चालू आहेत. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून 21 जुलै रात्री 10.30 वाजता इम्पॅक्ट वॉर्निंग प्रसिद्ध करण्यात आली होती. यात फ्लॅश फ्लडची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यात कमी वेळात अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  यामुळं रस्ते, रेल्वे, हवाई वाहतुकीला अडथळ्या सोबतच जुन्या इमारतींना धोका असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


Mumbai Rains LIVE : मुंबईसह राज्यभरातील पावसाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर...


कोल्हापूर जिल्हासाठी एनडीआरएफच्या 2 टीम पुण्याहून कोल्हापूरकडे रवाना 


कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने रात्रभर झोडपून काढलंय. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत चालली असून, पंचगंगा नदी आता इशारा पातळीच्या दिशेनं वाटचाल करत आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. अगदी तशीच परिस्थती निर्माण झालीय. पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फूट 8 इंचावर पोहोचली असून यामध्ये गेल्या 12 तासात पाणी पातळी साडे तीन फुटांनी वाढली आहे. ज्या वेळी पंचगंगा नदी 39 फुटांवर पोहचते त्यावेळी इशारा पातळी मानली जाते. आणि पंचगंगा 43 फुटांवर पोहोचते त्यावेळी नदीने धोक्याची पातळी गाठलेली असते. दुसरी महत्वाची घटना म्हणजे कोल्हापूर ते गगनबावडा रोड काल रात्रीपासून वाहतुकीस बंद केला आहे. मांडुकली आणि खोकुर्ले याठिकाणी रस्त्यावर पाणी आलं आहे. त्यामुळे गगनबावड्याला जाणारा मार्ग बंद ठेवलाय. तर कासारी नदीच्या पाणी पात्रात वाढ झाल्याने बर्की गावात जाणाऱ्या पुलावर पाणी आलं असून बर्की गावचा संपर्क तुटला आहे. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील 39 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, कोल्हापूर जिल्हासाठी एनडीआरएफच्या 2 टीम पुण्याहून कोल्हापूरकडे रवाना झाली आहे.  एनडीआरएफच्या एका टीममध्ये 25 जवान आहेत.  पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत असल्याने टीम दाखल होणार आहे. 
 
मध्यरात्रीच्या मुसळधार पावसामुळे वालधुनी नदीकाठच्या परिसरात पाणी शिरले


कल्याण डोंबिवली शहराला काल दुपारनंतर पावसाने झोडपून काढलं होते .सायंकाळी काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झाला होता मात्र  काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा पावसाने जोर धरला तो मध्यरात्रीपर्यंत कायम होता. या मुसळधार पावसामुळे कल्याण पश्चिमेकडील वालधुनी नदी दुथडी भरून वाहू लागली आणि नदी काठचा परिसर अशोक नगर, शिवाजी नगर परिसर पाण्याखाली गेला. मध्यरात्रीच्या सुमारास वालधुनी नदी दुथडी भरून वाहू लागली व पाणी या परिसरात शिरले. त्यामुळे नागरिकांनी घरे सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं .तीन दिवसांपूर्वी याच परिसरात कंबरेइतके पाणी शिरलं होतं .सुदैवाने पहाटे पाच नंतर पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला मात्र अजूनही पावसाची भीती त्यांच्या मनात कायम आहे .या नदीला संरक्षक भिंत बांधण्याची मागणी नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत रहिवाशांनी आपला संताप व्यक्त केला.


उल्हास नदीवर पुलाला पाणी
कर्जत आणि दहवलीला जोडणाऱ्या उल्हास नदीवर पुलाला पाणी लागलं आहे. रात्रभर पाऊस चालू होता त्यात रात्री 1 नंतर जोरदार पाऊस झाल्यानं ओसवाल नगर, इंदीरा नगर हा परिसर पाण्याखाली होती. जवळपास पहिल्या मजल्याला पाणी लागलं होतं. दहवली गावातील गावकरी रात्रभर जागे आहेत. अनेक चारचाकी, दुचाकी गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. गावकऱ्यांच्या माहितीनुसार 1989ला अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती.


भिवंडी शहरातील अनेक भागात पाणी, साखर झोपेत असताना अचानक घरात शिरले पाणी 
 
मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहर व ग्रामीण भागातील अनेक भागात सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्येच भिवंडी  शहरातील तसेच ग्रामीण भागातील हजारों घरात पाणी शिरलं आहे. शहरातील तीन बत्ती भाजी मार्केट, म्हाडा कॉलनी, शेलार नदी नाका बंदर मोहल्ला, ईदगाह , कारीवली, तांडेल मोहल्ला,मेट्रो हॉटेल, मिटपाडा, पडघा, महापोली या परिसरात पावसाचे पाणी शिरले आहे .  साखर झोपेत असताना अचानक घरात पाणी शिरले आहे व नागरिकांनी स्वतः आपल्या लहान मुलांना व इतर नातेवाईकांचा जीव वाचून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले जात आहे तर अनेक जण आपला जीव वाचवल्यासाठी इमारतीच्या टेरेसवर चढले. घरातील संपूर्ण वस्तू व रेशन गहू तांदूळ व जीवनाश्यक वस्तू या पाण्यात भिजल्याने नागरिकांना उपाशी राहण्याची वेळ येणार आहे. शासनाने या नागरिकांना लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी केली जात आहे.


कल्याणचं एपीएमसी मार्केट पाण्याखाली 


सततच्या मुसळधार पावसामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फळे, फुले व भाजीपाला आवार पाण्यात गेलं आहे. कल्याण खाडीचे पाणी बाजार आवारात घुसले आहे.


पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग बंद
सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यामधील चिपळूणच्या वशिष्टी पुलाला पाणी लागलं असून वशिष्टी पूल वाहतूकीस बंद करण्यात आला आहे. महामार्गावर काही ठिकाणी पाणीच पाणी झालं असून त्यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. 


परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला
परभणी जिल्ह्यात काल सकाळपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने ओढे ,नाले, नद्या ओसंडून वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. लोअर दुधना प्रकल्प 84% भरल्याने प्रकल्पाच्या 12  दरवाज्यांमधून 12192 क्युसेकने पाणी दुधना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे दुधना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यातील मानवतच्या सावंगी मगर, सेलूतील साळेगाव-हातनूर पुलावरुन पाणी जात असल्याने रायपुर, हातनुर, वालुर साळेगाव, निपाणी टाकळी येथे कसूरा नदीवरील पुलावरुन पाणी जात असल्याने परभणीचा संपर्क तुटलाय आहे. 


अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात ढगफुटीसदृष्य पाऊस 
अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात रात्री दीड वाजेपर्यंत अक्षरश: ढगफुटीसदृष्य पाऊस झालाय. या पावसाने संपूर्ण जिल्ह्यात पुर परिस्थिती निर्माण होत हाहाकार उडालाय. जिल्ह्यातील अनेक भागातील नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलेय.  अकोला शहरासह जिल्ह्यात रात्री जोरदार पाऊस झालाय. अकोला शहरातील मोर्णा नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरलेय. तर शहरातील अनेक वस्त्यांमधील घरातही पाणी शिरलेय. अकोला शहरातील खडकी भागातील प्राजक्ता कन्या शाळेमागच्या  परिसरातील जवळपास तीस घरं पाण्याखाली आलेय. या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी लोकांचे रेसक्यू ऑपरेशन सुरू करण्यात पाण्याच्या प्रवाहाने मोठ्या अडचणी येतायेत.