मुंबई : गणेशोत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण. मुंबई आणि उपनगरातील रहिवाशांना कोकणातील घराच्या दारात सुखरुप पोहचण्यासाठी एसटीने तब्बल 2200 जादा बसेसची सोय केली आहे. पुढच्या शनिवारपासून म्हणजे 27 जुलैपासून बसचं आरक्षण करता येणार आहे.
कोकणवासियांची वाढती मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने 2200 बसेस मुंबईच्या गणपती उत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. 28 ऑगस्ट ते दोन सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सवाची पहिल्या टप्प्याची जादा वाहतूक करण्यात येणार आहे.
एक महिना अगोदर म्हणजेच 27 जुलैपासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या वर्षीपासून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचंही आरक्षण एकाच वेळी करता येणार आहे.
20 जुलैपासून ग्रुप बुकींग
गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी मुंबईतील चाकरमानी गटागटाने बस आरक्षित करतात. मुंबईतल्या विविध उपनगरातील लोक एकत्र येऊन कोकणातील एकाच गावी किंवा सलग असणाऱ्या गावात जाण्यासाठी एसटीची बस आरक्षित करतात. ग्रुप बुकिंगला 20 जुलैपासून सुरुवात होत आहे. संबंधित प्रवाशांनी ग्रुप बुकिंगसाठी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असं आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात येत आहे.
मुंबई आणि उपनगरातील 14 ठिकाणाहून जादा बसेस सुटणार
28 ऑगस्ट ते दोन सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील 14 बस स्थानकं आणि बस थांब्यांवर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच परतीच्या प्रवासासाठी म्हणजेच सात सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत कोकणातील स्थानिक बस स्थानकांवरुन जादा बसेसची सोय करण्यात आली आहे.
कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथकं (ब्रेक डाऊन व्हॅन) तैनात करण्यात येणार असून प्रवाशांना प्रवासात तात्पुरत्या स्वरुपाची प्रसाधनगृहंही उभारण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाण्यासाठी 2200 जादा एसटी बस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jul 2019 02:06 PM (IST)
कोकणवासियांची वाढती मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने 2200 बसेस मुंबईच्या गणपती उत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -