मुंबई : फटाके हा ज्वलनशील आणि स्फोटक पदार्थ आहे. त्यामुळे फटाक्यांची विक्री करण्याची परवानगी अशी तडकाफडकी देता येणार नाही, असं स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अशाप्रकारची खबरदारी घेतली नाही तर प्रसंगी गंभीर दुर्घटनाही होऊ शकते, असेही न्यायालयाने म्हटलं आहे.
नवी मुंबईत राहणाऱ्या एका व्यावसायिकाने आपल्या दुकानाची रचना बदलण्याची परवानगी मागणारा अर्ज सिडकोकडे दिला होता. फटाके विक्रीचा व्यवसाय हा मोसमी असतो, दिवाळीच्या किंवा उत्सवाच्या दरम्यान तो सुरू राहतो. त्यामुळे त्यासाठी दुकानाची रचना बदलण्याची परवानगी त्यांनी मागितली होती. मात्र ही मागणी पनवेल महापालिकेने नामंजूर केली. याचिकादाराच्या दुकानाच्या बाजूची जागा सिडकोनं लाकडाची बाजरापेठ म्हणून आरक्षित केली आहे. त्यामुळे जर काळजी घेतली नाही तर याबाबत सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर दुर्घटना निर्माण होऊ शकते, असं कारण महापालिकेने देत ही परवानगी नाकारली होती.
त्याविरोधात व्यावसायिकानं मुंबई उच्च न्यायलयात याचिका केली होती. याचिकेवर न्यायमूर्ती अकिल कुरेशी आणि न्यायमूर्ती एस जे काथावाला यांच्या खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली. न्यायलयाने सिडकोच्या युक्तिवादाला सहमती दर्शविली. जमिनीच्या वापराबाबत पुर्नरचनेची मागणी करता येऊ शकते. मात्र फटाकेच्या दुकानासाठी तातडीने परवानगी देता येणे शक्य नाही. त्यामुळे चार आठवड्यात याचिकादाराने सिडकोकडे अर्ज करावा आणि जर सिडकोने यावर विचार केला तर महापालिकेनेही परवान्याबाबत विचार करावा, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.
फटाक्यांची विक्री करण्याची परवानगी तडकाफडकी देता येणार नाही : उच्च न्यायालय
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
22 Oct 2019 11:55 PM (IST)
फटाके हा ज्वलनशील आणि स्फोटक पदार्थ आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अशाप्रकारची खबरदारी घेतली नाही तर प्रसंगी गंभीर दुर्घटनाही होऊ शकते, असेही न्यायालयाने म्हटलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -