मुंबई: राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा हुबेहुब दिसणा-या विजय मानेला दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. त्यामुळे विजय मानेनं साल 2022 मध्ये पुण्यात त्याच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्याकरता हायकोर्टात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. विजय माने हा कुख्यात गुंड शरद मोहळच्याही संपर्कात होता असा खुलासा राज्य सरकारच्यावतीनं यावेळी हायकोर्टात करण्यात आला. तसेच याप्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू असल्यानं सध्या हा गुन्हा रद्द करणं योग्य ठरणार नाही असं सरकारी वकील मनकूवर देशमुख यांनी हायकोर्टाला सांगितलं.
काय आहे प्रकरण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखीच वेशभूषा, दाढी आणि कपडे परिधान करून हुबेहुब सीएम एकनाथ शिंदे बनून फिरणा-या विजय माने यांचा फोटो सराईत गुन्हेगारासोबत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती बंडगार्डन पोलीस ठाण्याला साल 2022 मध्ये मिळाली होती. त्यानंतर पेट्रोलिंग करत असलेल्या खंडणी विरोधी पथक दोनच्या अधिका-यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती घेतली असता त्यांना एक फोटो मिळाला. त्या फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे असून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ हा खुर्चीत बसल्याचं दिसत आहे.
याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांचं रूप घेऊन फसवल्याच्या आरोपात विजय नंदकुमार मानेविरोधात पुणे शहर गुन्हे शाखेनं कलम 419 (फसवणूक), कलम 469 (खोटी, बनावट कागदपत्रे तयार करणे किंवा बनावट सह्या करून कागदपत्रे तयार करणे), कलम 500 (बदनामी, अब्रू नुकसानी) या कलमांतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका माने यांनी अँड. असिम सरोदे यांच्यामार्फत दाखल केली आहे.
पोलिसांनी विजय माने याच्याविरोधात केलेली कारवाई प्रथमदर्शनी अत्यंत उत्साहाच्या भरात केलेली, चुकीची आणि बेकायदेशीर असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. त्यामुळे हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. मात्र राज्य सरकारची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती नीतीन बोरकर यांच्या खडंपीठानं ही याचिका फेटाळत असल्याचं सांगताच विजय मानेच्या वकिलांनी ही याचिका मागे घेतली.
ही बातमी वाचा: