मुंबई : आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर केलेला पोलिस ठाण्यातील गोळीबार हा ताजा असतानाच आता मुंबई पुन्हा एकदा गोळीबाराने हादरून गेली आहे. माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची आज (8 फेब्रुवारी) मुंबईमधील दहिसरमध्ये गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येनंतर महाराष्ट्र अवघा पुन्हा एकदा बंदुकीच्या गोळीने हादरून गेला आहे. विशेष म्हणजे अभिषेक घोसाळकर यांची हत्या अत्यंत थंड रक्ताने करण्यात आल्याचे घटनाक्रमावरून स्पष्ट झालं आहे.


या घटनेनंतर गेल्या  चार दिवसांपासून महाराष्ट्रातील वाढलेल्या गुंडगिरीवरून कडाडून हल्लाबोल सुरुच ठेवलेल्या खासदार संजय राऊत यांनी या घटनेनंतर यांनी ट्विट करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राऊत यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे असे मी रोज सांगत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज गुंड टोळ्याना भेटतात.पक्षात प्रवेश देतात.गृहमंत्री अदृश्य झाले आहेत. राज्य गुंडांच्या तावडीत आहे. म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलिस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार धक्कादायक आहे.अभिषेक मृत्यूशी झुंज देतोय. आणि गृहमंत्री फडणवीस चाय पे चर्चा करीत फिरत आहेत!फडणवीस राजीनामा द्या!






संजय राऊत यांनी अभिषेक मृत्यूशी झुंज देतोय असं ट्विटमध्ये म्हटलं असलं तरी त्यांचा करुणा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले होते, पण तीन गोळ्या शरीरात घुसल्याने अति रक्तस्त्राव होऊन त्यांची प्राणज्योत मालवली. तत्पूर्वी, अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यापूर्वी माॅरिस नोरोन्हा आणि अभिषेक यांनी जवळपास 40 मिनिटे फेसबुक लाईव्ह केले होते. या दरम्यान शेवटच्या चार मिनिटांमध्ये माॅरिस नोरोन्हाने जवळून पाच राउंड फायरिंग केल्याने अभिषेक गोसाळकर गंभीर जखमी झाले. त्यांना अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


दुसरीकडे, मॉरिसने सुद्धा घोसाळकर यांच्यावर हल्ला केल्यानंतर स्वत:च्या कार्यालयात स्वतःवरती गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सातत्याने गुंडांचा राजकीय प्रवेश त्याचबरोबर सुरु असलेला हैदोस चिंतेचा विषय झाला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या