महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जानेवारीमध्ये अधिसूचना जारी करुन, महसूल विभागामार्फत परिपत्रक काढलं होतं. यानुसार 19, 20, 21, आणि 23 फेब्रुवारी रोजी मद्यविक्रीला बंदी घालण्यात आली होती. या काळात दारुची खरेदी-विक्री, सेवन बंद राहिल, अशा आदेश देण्यात आला होता.
'ड्राय डे' जाचक आणि बेकायदेशीर, हॉटेल संघटनांची याचिका
परंतु निवडणूक काळातील ‘ड्राय डे’ जाचक आणि बेकायदेशीर असल्याचं सांगत ठाण्यातील हॉटेल मालक संघटनांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर आज न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
दारुबंदीचा नियम केवळ विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला लागू आहे, असा दावा याचिकार्त्यांनी केला. त्यावर हायकोर्टाने 19 फेब्रुवारीचा ड्राय डे रद्द केला. 20 आणि 21 तारखेला ड्राय डे कायम राहणार आहे. तर 23 तारखेला संपूर्ण दिवसाचा ड्राय डे उठवत, 5 वाजेपर्यंत म्हणजेच निकाल लागेपर्यंत लागू केला आहे.
21 फेब्रुवारीला 10 महापालिका आणि दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे. तर 23 फेब्रुवारीला निवडणुकांचा निकाल लागणार आहे.