Abdul Sattar : शासनाचा निर्णय डावलून वाळू ठेक्यासाठी जागा दिल्याप्रकरणी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करू नये, असेही आदेश खंडपीठाने दिले आहेत.
शासनाने 2012-13 ला शेख सलीम अब्दुल कादर पटेल यांना कुरण-पिंपरी येथे वाळूचा ठेका दिला होता. परंतु, पटेल यांनी अटींचा भंग केला. त्यामुळे त्यांना नऊ कोटी 76 लाख रुपये दंड आकारून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पटेल यांना दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा झाली होती. त्यावर पटेल यांनी शिक्षेविरोधात अपील केली होती. परंतु, त्यांचा अपीलाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.
पटेल यांचे शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळल्यानंतर त्यांची पुनर्विलोकन याचिका खंडपीठात प्रलंबित आहे. शासनाने त्यांना काळ्या यादीत टाकले होते. त्यानंतर वाळू ठेक्याचे ठिकाण बदलून देता येणार नाही आणि मुदतही वाढवून मिळणार नाही, असा शासन निर्णय 12 मार्च 2013 ला काढण्यात आला होता. असे असताना राज्यमंत्री सत्तार यांनी संबंधित शासन निर्णय डावलून 1 एप्रिल 2021 ला पटेल यांना पैठण तालुक्यातील घाणेगाव येथील वाळूचा ठेका दहा महिन्यांसाठी दिला होता. त्याची मुदत 1 फेब्रुवारी 2022 ला संपली आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी राज्यमंत्र्यांच्या आदेशाचा संदर्भ देऊन 10 फेब्रुवारी 2022 ला पटेल यांना पुन्हा दोन हजार 556 ब्रास वाळू उचलण्याची परवानगी दिली. या प्रकरणी न्यायालयाने मंत्री सत्तार यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Aurangabad : शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री संदिपान भुमरे यांच्यामध्ये तू-तू मैं-मैं
- Soygaon Nagar Panchayat: अब्दुल सत्तारांचा दानवेंना झटका; निवडून आलेल्या भाजपच्या चार सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश
- Maharashtra Politics:"ये लगाव है...प्यार है," रावसाहेब दानवे - अब्दुल सत्तार भेटीनंतर चर्चांना उधाण