मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 19 मार्चपासून पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईच्या डबेवाल्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. रोजगार नसल्यामुळं डबेवाल्यांवर उपसमारीची वेळ आली आहे. आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. या पार्श्वभूमीवर डबेवाल्यांनी सरकारकडे अनुदानाची मागणी केली आहे. मुख्यामंत्र्यांनी असंघटीत कामगारांना पैसे दिले मग आमच्या भूमीपुत्रांना का देणार नाही? असा सवाल देखील त्यांनी या वेळी उपस्थित केला.


लोकल ही जशी मुंबईची लाइफलाइन आहे, तशीच ती डबेवाल्यांचीही लाइफलाइन आहे. ती सुरू होत नाही तोपर्यंत डबेवाल्यांना आपली सेवा देणे शक्य नाही,' असं असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितलं. परंतु जेव्हा ही लाइफलाइन सुरू होईल तेव्हा ग्राहकांना आतापर्यंत जो विश्वास दाखवला तोच विश्वास भविष्यात देखील दाखवावा, अशी विनंती देखील त्यांनी या वेळी केली.


ज्याप्रमाणे मुंबईत डब्यांची सेवा आहे ती इतर राज्यात का नाही याबद्दल सोपानकाका मरे म्हणाले, मुंबईत पायाभूत सेवा असल्याने सेवा चांगल्या पद्धतीने देता आली आहे. पुणे, दिल्ली या सारख्या शहरांमध्ये ट्रॅफिकची समस्या मोठी आहे. त्यामुळे इतर शहरात ही सेवा देणे शक्य नाही.


सुभाष तळेकर म्हणाले, कोरोनामुळे अनेक सेवाभेवा संस्थाकडून मदत मिळाली आहे. या पुढे देखील ही मदत मिळावी. आम्हाला विश्वास आहे की, जोपर्यंत प्रेम आहे तोपर्यंत आमच्या डब्याला मरण नाही. कोणाची स्पर्धा आम्हाला भीती नाही. दक्षिण मुंबईत डब्यावाल्यांनी सेवा सुरू केला आहे. सरकारच्या सगळ्या नियमांचे पालन करणार आहे. फक्त ग्राहकांनी डबे सुरू करावी ही विनंती आहे.