सोलापूर : पुणे-सोलापूर महामार्गावर पोलीस नाईकच्या धाडसीवृत्तीमुळे भीषण अपघात होण्यापासून वाचला. पुणे-सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. गुरुवारी (10 सप्टेंबर) सकाळी 8.15 ते 8.20 च्या दरम्यान पुण्याहून सोलापुरच्या दिशेने एक गॅसने भरलेला टँकर येत होता. उरणवरुन निघालेला हा टँकर सकाळच्या सुमारास सोलापुरातील सावळेश्वर येथील पीएसआरडीसीएलच्या टोल नाक्यापर्यंत आला. या टोल नाक्यावर चालकाने टोल देखील भरला. मात्र, टोल भरल्यानंतर काही अंतर पुढे गेल्यानंतर टँकर नागमोडी अंगावर येत असल्याचं कर्तव्य बजावत असलेल्या महामार्ग पोलीस कर्मचारी संजय चौगुले यांच्या लक्षात आलं. निरखुण पाहिल्यानंतर चालक बेशुद्ध अवस्थेत असल्याचे चौगुले यांना लक्षात आलं.


चौगुले यांच्यासह तेथे कर्तव्य बजावत असलेले इतर काही कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता टँकरच्या डाव्या बाजूने धाव घेण्यास सुरुवात केली. तर दोन कर्मचाऱ्यांनी टोलवरुन निघणारी इतर वाहतुक थांबवली. तर संजय चौगुले हे थेट टँकरच्या मागच्या बाजुने जाऊन चालकाच्या दिशेने धावू लागले. जवळपास 30 किलोमीटर प्रति तास वेगाने गाडी धावत होती, अशी माहिती संजय चौगुले यांनी दिली. जवळपास 100 ते 200 मीटरचा अंतर धाव घेत, चालत्या गाडीचा ताबा पोलीस नाईक संजय चौगुले यांनी घेतला. अत्यंत हुशारीने एका हाताने त्यांनी बेशुद्धावस्थेतून बाहेर पडणाऱ्या चालकाला वाचवलं तर दुसऱ्या हाताने स्टेअरिंग नियत्रिंत करुन गाडी जागीच थांबवली. त्यामुळे पुढे होणारा मोठा अनर्थ टळला.


त्यानंतर टोलनाक्यावर तैनात असलेली रुग्णवाहिका देखील घटनास्थळी पोहोचली. चालकावर प्राथमिक उपचार केल्यानंतर संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकाशी पोलिसांनी संपर्क केला. पर्यायी चालकाची व्यवस्था केल्यानंतर गाडी पुढच्या प्रवासासाठी रवाना झाली. टोलनाक्यापासून थोड्या अंतरावर अनेक वाहन चालक रात्री प्रवास करण्याचे टाळून बाजूला गाडी लावून झोपलेले असतात. त्याच ठिकाणी अनेक कॅन्टिन आणि धाबे देखील आहेत. या कॅन्टिन आणि धाब्यांवर सकाळी चहासाठी लोकांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत गॅसने भरलेला टँकर जर पुढे गेला असता तर काय झालं असतं याची कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या अनेकांनी या घटनेचे फोटो काढले. पाहता पाहता फोटो सोशल मीडियावर वायरल होऊ लागले.


बार्शीत दोन वर्षांपासून खोदून ठेवले रस्ते, नागरिक हैराण, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल


ही बातमी महामार्ग पोलीस दलाचे अप्पर पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांच्यापर्यंत देखील पोहोचली. त्यांनी तात्काळ चौगुले यांच्याशी संपर्क करुन त्यांचे कौतुक केले तसेच बक्षिस देखील जाहीर केले. गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील ही माहिती कळताच ट्विट करुन त्यांनी चौगुले यांचे कौतुक केले. तर स्वत: फोन करुन देखील त्यांनी चौगुले यांचे अभिनंदन केले. दरम्यान घटनेची माहिती सोशल मीडियावर वायरल होताच सर्व स्तरावरुन पोलीस नाईक संजय चौगुले यांचे कौतुक होत आहे.


चालकाच्या आईला घटना कळताच कोसळले अश्रू, देवदुत पोलिसाचे मानले आभार


टँकर चालक अजय बाबासाहेब पाटील (वय 36) हा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील रहिवासी आहे. आपला मुलगा मोठ्या अपघातातून वाचल्याचं कळताच चालक अजय पाटील याचे वडील आणि आईं यांनी पोलीस नाईक अजय चौगुले यांचे आभार व्यक्त करण्यासाठी फोन केला. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. काही दिवसांपूर्वी अजयचा दुचाकीवरुन पडल्याने अपघात झाला होता. त्यावेळी त्याच्या डोक्याला ईजा झाली होती. लातूरमध्ये उपचार करण्यासाठी अजय जाणार होता. मात्र, त्यापूर्वीच हा प्रकार घडला. पोलीस नाईक संजय चौगुले यांनी दाखवलेल्या धाडसामुळे आपल्या मुलाचे प्राण वाचले. त्यामुळे देवदुत असल्याची भावना चालक अजय पाटीलच्या आईने फोनवरुन बोलताना व्यक्त केली.


Former Navy Officer | पोलिसांवर राजकीय दबाव नाही, आरोपींवर कारवाई होणारच - विश्वास नांगरे पाटील