Kirit Somaiya : आयएनएस विक्रांत बचाव या मोहिमेसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत झालेल्या कथित घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत मुंबई सत्र न्यायालयानं त्यांची अटकपूर्व जामीनासाठीची याचिका फेटाळून लावलीय. याप्रकरणी सोमय्या यांचे पूत्र नील सोमय्या यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनावर उद्या मंगळवारी निकाल देऊ असं विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी स्पष्ट केलं. विक्रांत बचावसाठी गोळा केलेला निधी हा सर्वपक्षांकडनं गोळा करण्यात आला होता. तसेच राजभवनाकडे कोणतंही बँक खात नसल्यानं तो निधी आमच्या पक्षाकडे जमा केला, त्यानंतर त्याचं काय झालं माहिती नाही?. अशी भूमिका सोमय्या यांच्यावतीनं मांडण्यात आली. मात्र जर तुम्ही लोकांकडनं निधी गोळा केलात तर ती तुमची जबाबदारी होती की, तो योग्य ठिकाणी जातोय की नाही यावर लक्ष देणं. त्यामुळे तो कुठे याचं उत्तर तुम्ही देऊ शकत नसाल तर तुम्हाला आम्ही कोणताही दिलासा देऊ शकत नाही. असं कोर्टानं किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना स्पष्ट केलंय. सोमय्या यांच्यावतीनं आता या निकालाला तातडीनं हायकोर्टात आव्हान दिलं जाणार आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आरोपांनंतर मुंबई पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या दोन पक्षा मोठा राजकिय वाद सुरूय. त्यामुळेच या दोन पक्षांतील नातेसंबंध खराब झालेत, हे जगजाहीरय आणि म्हणूनच हे आरोपप्रत्यारोप सुरू आहेत हे काही वेगळं सांगायला नको. असा युक्तिवाद सोमय्या यांच्यावतीनं जेष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी केला. तसेच साल 2013-14 मध्ये गोळा केलेल्या वर्गणीची साल 2022 मध्ये पावती मागणं यावरून तक्रारदाराच्या हेतूवरही सवाल निर्माण होतो असं ही ते म्हणाले. याशिवाय हा मदतनिधी 57 कोटींचा होता असा जर दावा करण्यात येत असेल तर जर रस्त्यांवर उभं राहून इतका निधी गोळा होऊ शकतो का?, असा सवाल उपस्थित करत आपण केवळ 11 हजारांच्या आसपास निधी गोळा केला होता असा खुलासा किरीट सोमय्या यांनी कोर्टात केला आहे. किरीट सोमय्यांनी वारंवार महाविकास आघाडी सरकारवर पुराव्यांनिशी आरोप केले आहेत. त्यानंतर पलटवार करताना "बापबेटा जेल जाएंगे", या आशयाची विधानं गेल्या महिन्याभरापासून सुरू होती. त्याच दबावाखाली हा गुन्हा दाखल झालाय असा आरोपही सोमय्यांच्यावतीनं कोर्टात करण्यात आला होता.