रावसाहेब दानवे.. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष.. अपेक्षा अशी होती की यांनी पक्षाचं काम वाढवून सरकारचं काम सोपं करावं.. पण यांच्या वर्ल्ड फेमस वादग्रस्त विधानांमुळे सरकारला यांच्या बचावासाठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे दानवेंचा पर्याय शोधण्याची तयारी केंद्रीय नेतृत्वानं केल्याची माहिती आहे.
रावसाहेब दानवे भाजपचा मराठा चेहरा आहेत. त्यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा देऊन केंद्रीय नेतृत्वानं सोशल
इंजिनियरींगचा प्रयोग केला. मात्र दानवेंनी वेळोवेळी वादग्रस्त विधानं करुन पक्षालाच अडचणीत आणलं. शिवाय निर्णय प्रक्रियेत मुख्यमंत्र्यांचं डॉमिनेशन पाहता दानवे काय करतात? असा प्रश्न आहे.
किमान सरकार आणि पक्षाची अडचण दूर व्हावी, असा त्यामागचा हेतू आहे. मात्र आधी दानवेंनी शेतकऱ्यांबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर लक्ष्मीदर्शन घेण्याचा सल्ला आणि आता थकवलेलं वीज बिल. त्यामुळे त्यांच्या गच्छंतीची दाट शक्यता मानली जात आहे.
आता मुख्यमंत्र्यांनाच सुळावर चढवण्याची तयारी करणारा चेहरा म्हणजे प्रकाश मेहता. एमपी मिल कंपाऊंडचा
एफएसआय खासगी बिल्डरच्या घशात घालण्यासाठी यांनी फाईलवर थेट मुख्यमंत्र्यांचं नाव वापरण्याची कमाल केली. मेहतांच्या कबुलीमुळे त्यांचा हेतू स्वच्छ आणि पारदर्शी नव्हता, यावर शिक्कामोर्तब झालं.
मारुतीच्या शेपटीपेक्षा जास्त लांब असलेली एसआरए घोटाळ्याची मालिका मुख्यमंत्र्यांसाठी अडचणीची ठरु लागली आहे. शिवाय मेहतांना हटवलं नाही, तर खडसेंवर अन्याय झाल्याची भावना एका समाजात बळावू शकते आणि सरकार बिल्डरधार्जिणं असल्याचा प्रचारही वाढू शकतो. त्यामुळे मेहतांना विश्रांती देण्याची सक्ती होणार आहे.
विष्णू सावरा.. राज्याचे आदिवासी विकासमंत्री.. पालघर जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. एप्रिल 2016 पासून तब्बल 600 आदिवासी मुलं दगावली. देशभर राज्याची बेअब्रू झाली. त्यामुळे सावरांच्या कारभारावर मुख्यमंत्री नाखुश आहेत. त्यामुळे सावरांना आपला कारभार आवरावा लागणार आहे.
दिवाळीत फडणवीस सरकार 3 वर्षांचं होईल. लोकसभेसोबत विधानसभा झाली तर फक्त दीड वर्ष हातात आहे. अशावेळी दानवे, मेहता, सावरा, देसाईंसारख्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून मतदारांना सामोरं जाणं लज्जास्पद ठरु शकतं. त्यामुळे मंत्र्यांच्या इमेज मेकओव्हरपेक्षा मंत्री बदलणं जास्त सोपं आहे. ज्याची झलक महिन्याभरात दिसेल.