अहमदनगर : भगवानगडावरच्या वादावरुन सुरु झालेला ऑडिओ क्लीपचा वाद आता वेगळंच वळण घेत आहे. काल पंकजा मुंडेंनंतर नामदेवशास्त्रींची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली. यात शास्त्री एखाद्याला फाडून खाण्याची भाषा करत आहेत.

मला ब्लॅकमेल करण्यासाठी हा फोन गर्जे नावाच्या पत्रकारानं केला असावा, अशी शंका नामदेवशास्त्रींनी व्यक्त केली आहे. मात्र या पत्रकारासोबतचं संपूर्ण संभाषण ऐकल्यानंतर हा पत्रकार नामदेवशास्त्रींना ब्लॅकमेल करत आहे, असं प्राथमिकदृष्टया कुठेही आढळत नाही. त्यामुळे नामदेवशास्त्रींनी ब्लॅकमेल करण्याचा आरोप हा बिनबुडाचा असल्याचं पत्रकार गर्जे यांनी म्हटलं आहे.

भगवानगडावर दसऱ्या मेळाव्यानिमित्त राजकीय वा इतर कोणतंही भाषण होऊ नये, अशी भूमिका गडाचे महंत नामदेवशास्त्रींनी घेतली आहे. तर पंकजा मुंडे मात्र भाषणावर ठाम राहिल्यानं हा वाद उभा राहिला आहे.

मी शास्त्रींना ब्लॅकमेलिंग केलेलं नाही, त्यांनी तसे पुरावे द्यावेत, मी दोषी आढळल्यास कारवाई करावी, मात्र तसं न झाल्यास मी त्यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा करणार, असा इशारा पत्रकार गर्जे यांनी दिला आहे.
नामदेव शास्त्री आणि पत्रकारातील संभाषण :

पत्रकार - हॅलो

नामदेव शास्त्री - बोला सरजी काय म्हणता ?

पत्रकार - काय नाय बाबा थोडंसं बोलायचं होतं

नामदेव शास्त्री - बोला ना बोला

पत्रकार  - मी म्हटलं, हा विषय संपवूनच टाकू डायरेक्ट, मी बोलू का मग ताईंशी ? काय तिचं म्हणणं आहे, कारण की विषय क्लोज केलेलाच परवडला, काय लय डोक्याला ताण होऊ लागलाय याचा.

नामदेव शास्त्री - गर्जे मी नामदेव शास्त्री आहे, माझ्या मागे पण लोकं आहेत.. मी सत्तेसोबत लढतोय.. मी माणसं थांबवली आहेत.. जरी तुम्हाला तुमच्या नगरचं कळत असेल ना, तरी मी फाडून खाईल एखाद्याला एवढी ताकत आहे माझ्यात.. मी समाज आहे म्हणून शांत आहे अजून, नाहीतर लोक आमची एवढी खवळली आहेत ना.. त्यांना कळत नाही का भगवान गडासाठी करतो

म्हणून.. तुम्ही ऐका.. या भानगडीत तुम्ही पडूच नका गर्जे..

माझं कुठलंही लफडं नाही.. ते जे फोटो आहेत ना, ते भगवान बाबांच्या नातींचे आहेत. एक इंजिनीअर आहे, एक एमबीए आहे.. तुमच्या माहितीसाठी सांगतो जरा तपास करा तुम्ही..

पत्रकार - नाही नाही फोटोंचा काय विषयच नाही बाबा.. मी त्यासाठी फोनच नाही केला..

नामदेव शास्त्री - मला रमेश घुले काय करतो, किंवा अजून कोण काय करतो ना हे सगळं लक्षात आहे.. तुम्हाला कशाला काय बोलणार आहेत महाराज एवढे मोठे मोठे लोक दमलेत.. तुम्ही काय मिटवणार आहे ते..  जाऊन भेटा तुम्ही, भाषण सोडून मला सगळं मान्य आहे..

भाषण गडावर करायचं नाही, बाकी सगळं मला मान्य आहे.. शुभेच्छा नाही, स्टेज नाही, काहीच नाही... यायला बंदी नाही, हे मी टीव्हीवर बोललोय.. आणि मला काय राजकारण नाही करायचं

गर्जे... माणसं थांबवलीत मी.. तुम्हाला माहितीय परिसर कसा आहे..

पत्रकार- बरोबर आहे, महाराज मी तुमच्यापेक्षा एवढा लहान आहे ना.. पण या विषयाचा मला खूप त्रास होतोय..

नामदेव शास्त्री - काही त्रास करून घेऊ नका गर्जे.. मी मजबूत आहे..

पत्रकार- नाही परत काय घडलं बिडलं..

नामदेव शास्त्री - अहो मरू द्या हो, मरू द्या.. काय त्यांना आसाराम बापू करू द्या.. कसंय ना गर्जे..  ज्या कुळात जन्माला आलो ना त्या संताला त्रास देणं हे आपलं कर्तव्य आहे.. तुम्ही ज्या कुळात जन्माला आलेत ना... तो घुले असेल, तुम्ही असेल, मी असेल. कारण एवढा चांगला गड केलाय ना.. कारण की आपल्या आई बापाचा उद्धार, भगवानबाबाचा उद्धार तुम्ही केलाच पाहिजे, आपली खानदान ती आहे

पत्रकार - बरोबर आहे पण हे कुठंतरी सपलं पाहिजे..

नामदेव शास्त्री - मी कशाला संपवू.. मला थोडीच राजकारण करायचं आहे.. मी काय सांगितलं की मी भाषण करू देणार नाही.. बाकी सगळ्या तडजोडी मला मान्य आहे..

पत्रकार - कसंय ना बाबा तुमचा पण सन्मान व्हायला पाहीजे ना

नामदेव शास्त्री - गर्जे गर्जे… तुमच्यासोबत बोललो ना मी आता.. तेवढं समजून घ्या आता..

संबंधित बातम्या :


एखाद्याला फाडून खाईन इतकी ताकद आहे माझीः नामदेव शास्त्री


भगवान गड वादः नामदेव शास्त्रींचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र


चंद्र-सूर्य असेपर्यंत भगवानगडावर भाषण नाही : नामदेवशास्त्री


पंकजा खरं बोलल्या, हा घ्या पुरावा : धनंजय मुंडे


पंकजा मुंडे राजीनामा द्या : धनंजय मुंडे