Mukhyamantri Ladka Bhau Yojana: राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) जाहीर केल्यानंतर लाडक्या भावांसाठी काय? असं म्हणत विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर हल्लाबोल केला होता. त्यानंतर सरकारनं लाडका भाऊ योजना (Mukhyamantri Ladka Bhau Yojana) जाहीर केली आहे. या योजनेबाबत आता युवकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाल्याचं चित्र दिसून येत आहे.
राज्यात 3 डिसेंबर 1974 पासून सुरू असलेली महाराष्ट्र सरकारची "रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम" योजना यामध्ये बदल करुन सरकारने नव्याने ही योजना जाहीर केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) जाहीर केल्यानंतर लाडक्या भावांसाठी योजना सुरू करत असल्याचं मुख्यमंत्री यांनी म्हटलं होतं.अर्थसंकल्पात घोषणा केलेली ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना‘ हीच लाडक्या भावांसाठीची योजना आहे. राज्यातील युवकांसोबत युवतीनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
- राज्यातील दहा लाख युवकांना या योजनेचा मिळणार लाभ
- यासाठी साडेपाच हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित
- उमेदवाराचे किमान वय 18 ते 35 वर्ष असावे
- व्यावसायिक प्रशिक्षण घेणाऱ्या युवती आणि युवकांना मिळणार या योजनेचा लाभ
- शिक्षण चालू असलेल्या उमेदवाराला लाभ मिळणार नाही
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असेल सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल
- या योजनेसाठी खाजगी क्षेत्रातील मनुष्यबळाच्या दहा टक्के सेवाक्षेत्रासाठी 20 टक्के उमेदवार घेता येतील
- शासकीय निमशासकीय महामंडळात मंजूर पदांच्या पाच टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणसाठी घेता येतील
कोणाला किती रुपये मिळणार?
बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6 हजार रुपये स्टायपेंड
डिप्लोमा झालेल्या तरूणाला दरमहा 8 हजार रुपये स्टायपेंड
पदवीधर तरूणाला दरमहा 10 हजार रुपये स्टायपेंड
योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी-शर्थी काय?
तरूणांना कारखान्यात वर्षभर अप्रेंटीसशिप करावी लागणार
अप्रेंटीसशिपमधून कार्यानुभव,स्कील्ड मॅनपॉवरसाठी सरकारची गुंतवणूक
ज्या कारखान्यात काम करेल,तिथे स्टायपेंडचे पैसे सरकार भरणार
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढं काय?
युवकांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित कंपनीकडून त्यांना प्रमाणपत्र दिलं जाईल. संबंधित आस्थापना अथवा कंपनीला युवकाचं काम योग्य वाटल्यास त्यांना तिथं नोकरी देऊ शकतात. याशिवाय राज्य सरकार देत असलेल्या विद्या वेतनाशिवाय अधिकची रक्कम संंबंधित आस्थापना युवकांना देऊ शकतात. युवकांना राज्य सरकारकडून देण्यात येणारा स्टायपेंड दरमहा दिला जाणार आहे. हा स्टायपेंड सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मिळेल. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा लाभ संबंधित युवक फक्त एकदाच घेऊ शकतो.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज कसा कराल?
कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्त यांच्याकडून ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी व्यवस्था येत्या काही दिवसात तयार केली जाईल. त्यानुसार बारावी, आयटीआय, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या युवकांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.