Mukhyamantri Teerth Darshan Yojana: मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) योजने'नंतर आता महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Government) 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत 60 वर्षांवरील नागरिकांना देशभरातील तब्बल 66 तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना 30 हजारांपर्यंत अनुदानही मिळणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'ची घोषणा केली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, "देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णवी यात्रा, अमरनाथ यात्रा इतर धर्मीयांची ही मोठी तीर्थक्षेत्रे आहेत. जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते, पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते, परंतु गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे, तसेच कोणी सोबत नसल्यामुळे आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. राज्य शासन हे राज्यातील गरीब वंचित समाजाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे याचे आम्हाला समाधान आहे, निश्चितच राज्यातील ज्येष्ठांचे आशीर्वाद सरकारला मिळतील व त्यातून निश्चितच सरकारला ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल."
'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' सुरू करण्यामागे सरकारचा मानस काय?
भारत विविधतेनं नटेलेला देश आहे. आपल्या देशात विविध धर्मांचे आणि पंथांचे लोक राहतात. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरु होऊन गेले आहेत. ज्यांच्या विचारांचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला असून एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचं नाव घेतलं जातं. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची, भक्ती मार्गाची शेकडो वर्षांची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य, समाजकार्य भक्ती मार्गानं प्रवास करत असतात.
आपलं दैनंदिन कर्तव्य पार पाडीत असताना देखील आपल्या देवदेवतांचं/भगवंतांचं नामस्मरण, चिंतन करत आयुष्य जगत असतात. देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांचीही मोठी तीर्थस्थळं आहेत. जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचं बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचं स्वप्न असतं. पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते. परंतु गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वा कोणी सोबत नसल्यानं आणि पुरेशी माहिती नसल्यानं अनेक ज्येष्ठ नागरिकांचं तीर्थयात्रा करण्याचं स्वप्न पूर्ण होत नाही. सदर बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणं सुकर व्हावं, यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची/दर्शनाची संधी देण्यासाठी 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' सुरू करण्यात आली आहे.
कोणाला लाभ मिळणार? योजनेचं उद्दीष्ठ काय? (Who Will Get Benefit From Mukhyamantri Teerth Darshan Yojana?)
राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक, म्हणजेच ज्यांचं वय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक आहे, अशा व्यक्तींना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' सुरू करण्यात आली आहे. राज्यातील ज्यष्ठे नागरिकांना तीर्थयात्रा मोफत उपलब्ध करुन देणं हे 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' सुरू करण्याचं मुख्य उद्दीष्ट आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत तरतूदी काय? (What Are Provisions Under CM Tirtha Darshan Yojana?)
सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य आणि भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. तीर्थस्थळांची यादी परिशिष्ट 'अ' आणि 'ब' प्रमाणे असेल. सदर यादीमधील स्थळं कमी होऊ शकतात अथवा स्थळांमध्ये वाढदेखील होऊ शकते. सदर योजनेंतर्गत निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल. तसेच, प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती तीस हजार रुपये इतकी असेल. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवासाची सोय इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल.
'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' सुरू करण्यासाठी काय पात्रता आवश्यक? (Eligibility Required For CM Tirtha Darshan Yojana?)
- लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणं आवश्यक
- वय वर्ष 60 आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिक
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावं.
'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'साठी अपात्र कोण ठरणार? (Who Will Be Disqualified For Mukhyamantri Teerth Darshan Yojana?)
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, असे सदस्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार नाहीत. दरम्यान, 2.50 लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी मात्र या योजनेसाठी पात्र ठरतील.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
- ज्यांच्याकडे चारचाकी वाहनं (ट्रॅक्टर वगळून) त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
- प्रवासासाठी शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगानं ग्रस्त नसावं, जसं की टीबी, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोना, थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी.
- अर्जासोबत, ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यानं पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल. (हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवसांपेक्षा जास्त जुनं नसावं)
- जे अर्जदार मागील वर्षांमध्ये लॉटरीत निवडले गेले होते, परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही, अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरवलं जाणार नाही.
- जर असं आढळून आलं की, अर्जदार/प्रवाशानं खोटी माहिती देऊन किंवा कोणतीही तथ्यं लपवून अर्ज केला आहे, ज्यामुळे तो/ती प्रवासासाठी अपात्र ठरतं, तर त्याला/तिला कधीही योजनेच्या लाभांपासून वंचित ठेवता येईल.
- सदर योजनेच्या 'पात्रता' आणि 'अपात्रता' निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेनं कार्यवाही करण्यात येईल.
'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'चा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक? (What Documents Are Required For Scheme?)
- योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
- लाभार्थ्याचे आधार कार्ड/रेशनकार्ड
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. (लाभार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतंही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.)सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपर्यंत असणं अनिवार्य) किंवा पिवळे/केशरी रेशनकार्ड
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक
- सदर योजनेच्या अटी शर्तीचं पालन करण्याबाबतचं हमीपत्र.
योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करावा? (How And Where To Apply For Mukhyamantri Teerth Darshan Yojana?)
- योजनेचा अर्ज पोर्टल/मोबाईल अॅपद्वारे/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरला जाऊ शकतो.
- पात्र ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
- ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल.
- अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
अर्जदारानं स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक असेल जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. यासाठी अर्जदाराकडे खालील माहिती आणणं आवश्यक आहे...
- कुटुंबाचं ओळखपत्र (रेशनकार्ड)
- स्वतःचं आधार कार्ड
लाभार्थ्यांची निवड कशी होणार?
प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे पुढील प्रक्रियेनुसार केली जाईल.
- प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल, ज्यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन
- कोटा निश्चित केला जाईल. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे (लॉट्सचे संगणकीकृत ड्रॉ) प्रवाशांची निवड केली जाईल.
- कोट्यातील 100 टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रतिक्षा यादी देखील तयार केली जाईल.
- निवडलेला प्रवासी प्रवासाला न गेल्यास, प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीला प्रवासास पाठवता येईल.
- निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या
- सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमांद्वारे प्रसारित केली जाईल.
- फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकेल. तो/ती त्याच्यासोबत इतर कोणत्याही व्यक्तीला घेऊन जाऊ शकणार नाही.
- जर पती-पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरीत निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेल, तर आयुक्त,
- समाजकल्याण आयुक्तालय, पुणे त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील.
लाभार्थ्यांच्या प्रवासाचं नियोजन कसं केलं जाईल?
- जिल्हास्तरीय समितीनं निवडलेल्या प्रवाशांची यादी आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांचेकडे सुपूर्द केली जाईल.
- निवडलेल्या प्रवाशांची यादी प्रवासासाठी अधिकृत टुरिस्ट कंपनी / एजन्सीला देण्यात देईल.
- नियुक्त अधिकृत टुरिस्ट कंपनी/एजन्सी टूरवरील प्रवाशांच्या गटाच्या प्रस्थानाची व्यवस्था करेल.
- प्रवाशांच्या प्रवासासाठी आवश्यक त्या सुविधा आणि कोणत्या सुविधा देण्यात याव्यात याचा निर्णय राज्य शासन घेईल.
- सर्व यात्रेकरूंना प्रवासासाठी नियोजित स्थळी त्यांच्या स्वखर्चाने पोहोचावे लागेल.
प्रवासादरम्यान लाभार्थ्यांना अटी-शर्थींचं पालन करावं लागणार
- प्रवाशांना कोणताही ज्वलनशील पदार्थ किंवा मादक पदार्थ कोणत्याही स्वरूपात वाहून नेण्यास प्रतिबंध राहील.
- राज्याची/देशाची प्रतिमा खराब होणार नाही अशा रितीने यात्रेकरूंनी यात्रेच्या प्रतिष्ठेनुसार वागावे.
- प्रवासी त्यांच्या नियुक्त संपर्क अधिकारी / व्यवस्थापक यांच्या सूचनांचे पालन करतील.
- वरील आचारसंहितेचे पालन करण्याच्या इराद्याबाबत प्रवाशांकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाईल.
- प्रवाशांना विभागाच्या विहित प्रणालीमध्ये सहकार्य करावे लागेल आणि शिस्तीत सहकार्य करणे अपेक्षित आहे. कोणताही प्रवासी इतर प्रवाशांची गैरसोय होईल असे वर्तन करणार नाही.
- साधारणपणे, ट्रेनमध्ये बर्थवर झोपण्याची वेळ रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत असेल आणि प्रवासी त्यांच्या संबंधित बर्थवर झोपतील. विभागीय गरजेनुसार यावेळी काही बदल केले जाऊ शकतात.