मुंबई : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिला भगिनींचा (Ladki Bahin Yojana) तुफान प्रतिसाद मिळत असून आता सरकारकडूनही या योजनेतील महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जात आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने केलेल्या नारीशक्ती अॅपच्या माध्यमातून आलेल्या अर्जांपैकी गेल्या 2 दिवसांत तब्बल 1 कोटी 5 लाख अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. दोन दिवसांत या अॅपवर 1 कोटी 41 लाख महिलांनी अर्ज केले होते. त्यामुळे, सरकारकडून आता योजनेच्या अंमलबजावणीलाही सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात (Bank) या योजनेचा पहिला हफ्ता 3000 रुपये जमा होणार आहे. त्यासंदर्भातील पहिली चाचणी आज यशस्वी झाल्याची माहिती महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली. मंत्री तटकरे यांनी दिलेल्या या माहितीमुळे राज्यातील 1 कोटींहून अधिक महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.  


"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेच्या अर्जांची छाननी शेवटच्या टप्प्यात असून 16 व 17 ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्याचा सरकारचा मानस आहे. ही प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पार पडावी यासाठी तांत्रिक पातळीवर पडताळणी करणे अत्यावश्यक आहे. यासाठी आज काही महिलांच्या बँक खात्यात प्रायोगिक तत्त्वावर एक रुपया रक्कम जमा करण्यात आली. यावेळी उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी तातडीने दुरुस्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी ट्विटरवरुन दिली. त्यामुळे, ज्या महिलांच्या बँक खात्यात आज एक रुपया जमा झाला नाही, त्यांनीही घाबरुन जाण्याचं कारण नाही. कारण, शासनाकडून तांत्रिक त्रुटी लक्षात घेऊन द्या दुरूस्त करण्यात येत आहेत.  दरम्यान, आज महिलांच्या बँक खात्यात पाठविण्यात आलेली 1 रुपयांची रक्कम ही केवळ एक तांत्रिक पडताळणी असून याबद्दल कोणत्याही गैरसमज किंवा अपप्रचाराला बळी पडू नये, अशी विनंती देखील आदिती तटकरे यांनी केली आहे. 






अजित पवारांची फाईलवर सही


माझी लाडकी बहीण ही योजना आम्ही तुमच्यासाठी दिली आहे. गावागावात, पाड्यावर, वाडीवस्तीवर सगळीकडं माहिती झालीय की, अशी योजना आलीय. गावाकडं आई स्वत:च्या पोटाला चिमटा देऊन आपल्या लेकरांसाठी काहीतरी करते. पण, तिलाही वाटत असेल कुठतरी जत्रेत जावं, काहीतरी घ्यावं. महिलांच्या या आशा, अपेक्षांसाठी आम्ही यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना आणली. आया बहिणींनो, माय माऊलींनो, तुमचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही हा अजित दादांचा वादा आहे. माझ्या माय माऊलीच्या पाठीशी मी आहे. कालच, मी 6000 कोटी रुपयांच्या फाईलवर सही करुन आज तुम्हाला भेटायला आलोय, असे अजित पवार यांनी दिंडोरीत भाषण करताना म्हटले.