Maharashtra ST Workers: तब्बल चार हजार कोटी आर्थिक उलाढाल असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजलं असून आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेतील कोरोना काळात करण्यात आलेल्या ऑडिटची चौकशी सहकार खात्याकडून सुरू आहे. मात्र, ही चौकशी सहकार खात्याकडून न करता पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागा मार्फत करावी मागणी महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
एसटी बँक आणि सभासदांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्याकडे सोईस्करित्या दुर्लक्ष केले जात असून कर्मचाऱ्यांच्या समस्या, त्यांच्याशी निगडीत असलेले मुद्दे माहिती नसलेले लोक या बँकेत घुसखोरी करण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. बँक निवडणुकीत मुख्य मुद्द्यांना सोयीस्करपणे बगल दिली जात असून ज्यांचा बँकेच्या उभारणीत किंवा जडणघडणीत काहीही संबंध नाही अशा राजकीय नेत्यांचे फोटो लावून त्यांच्या नावे बँक निवडणुकीत मते मागितली जात आहेत. हा प्रकार दुर्दैवी असल्याचे मतही श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले आहे.
कर्मचाऱ्याच्या हितासाठी स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना करण्यात आली आहे. बँकेचे 70 हजार सभासद असून बँकेची 4 हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल आहे. कोरोना काळात ऑडिट झाले नव्हते. त्यामुळे शाखानिहाय ऑडिटर नेमले गेले. आश्चर्य म्हणजे त्यांनी दोन वर्षाचे ऑडिट एक-दोन दिवसात करून टाकले. यासाठी एका शाखेकडून तब्बल 80 हजार रुपये तपासणी करणाऱ्यांना देण्यात आले. या संपूर्ण ऑडिटसाठी बँकेकडून सुमारे 65 लाख रुपये संबंधित संबंधितांना दिले गेले. या उधळपट्टीत गैरव्यवहार झाला असल्याचा संशय असल्याचा आरोपही बरगे यांनी केला आहे.
कर्मचाऱ्यांच्या हितासाठी असलेल्या व त्यांच्या परिश्रमातून उभारलेल्या या बँकेच्या कारभारात पारदर्शकपणा यावा, 70 हजार सभासद असलेल्या सभासदांचे नुकसान होऊ नये असे आम्हाला वाटते. मात्र, सध्या सुरू असलेल्या एसटी बँकेच्या निवडणुकीत भावनिक मुद्यांवर भर दिला जात असून गैरव्यवहारांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बरगे यांनी म्हटले. ज्यांना बँक, एसटी कर्मचारी यांचे मुद्दे माहिती नाहीत, ज्यांनी कर्मचाऱ्यांना भावनिक करून साडे पाच महिने संप केला, एसटीचे विलीनीकरण व सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर वेतन दिले जाईल त्याच प्रमाणे संप कालावधीतील साडे पाच महिन्यांचा पगार भरून देऊ असे सांगून कामगारांची फसवणूक केली तेच लोक पुन्हा बँक निवडणुकीत स्वतःचे पॅनल करून फसवणूक करत असल्याची टीका बरगे यांनी सदावर्ते यांचे नाव न घेता केली. त्यांच्या पासून कर्मचाऱ्यांनी सावध झाले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
बँकेची एकूण उलाढाल 4 हजार कोटी रुपयांची आहे. बँकेची स्थिती चांगली आहे. पण काही संधीसाधूनी आर्थिक उधळपट्टी केली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर व गडहिंग्लज या शाखेत गरज नसताना कलर काम व दुरुस्ती करण्यात आली आहे. अशी उधळपट्टी थांबायला हवी असे बरगे यांनी म्हटले आहे. बँकेच्या 50 शाखा, 11 विस्तार केंद्र आहेत. सर्व आगारात एटीएम सेंटर उभी करून खातेदारांना सुविधा पुरविल्या पाहिजेत.व गरज नसलेल्या शाखा व विस्तार केंद्र बंद केली पाहिजेत. सभासदांनी कर्ज घेतल्यावर त्यावर जे व्याज लावले जाते ते कमी करणे आवश्यक आहे, पण हे करण्यात सुद्धा अडचणी आहेत. कारण बँक फक्त ३ टक्क्यांवर चालत आहे. कर्जावरील व्याज कमी केल्यास बँक चालवणे मुश्किल होईल. म्हणून काही अनावश्यक शाखा व विस्तार केंद्र कमी करून त्यावर होणारा खर्च कमी करून सभासदांच्या कर्जावरील व्याजदर कमी करायला हवा, याकडेही बरगे यांनी लक्ष वेधले आहे.