मुंबई : एसटीचा प्रवास आता कॅशलेस पद्धतीने करता येणार आहे. महाराष्ट्राच्या लालपरीचा शनिवारी (1 जून)  71 वा वर्धापनदिन साजरा झाला. वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते स्मार्टकार्ड योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

मुंबई लोकलच्या एटीव्हीएम या कॅशलेस प्रणालीच्या धर्तीवर एसटीचे हे स्मार्ट कार्ड असेल. स्मार्ट कार्डची किंमत 50 रुपये असेल. तर रुवातीला त्यामध्ये 300 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. त्यानंतर 100 रुपयांच्या पटीत 5 हजार रुपयांपर्यंत रिचार्ज करता येईल. हे कार्ड हस्तांतरणीय असून कुटुंबातील कोणतीही व्यक्ती किंवा मित्र एसटीच्या प्रवासावेळी हे कार्ड स्वाइप करुन प्रवास करु शकतील. एसटी प्रवासाशिवाय शॉपींगसाठीही हे कार्ड वापरता येणार आहे.

ऑगस्ट क्रांती मैदानाजवळील गोकुळदास तेजपाल सभागृहात एसटीचा 71 वा वर्धापनदिन शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दिवाकर रावते यांनी प्रवाशांसाठी तसेच एसटी महामंडळातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी अनेक योजना जाहीर केल्या.

एसटीसाठी सध्या इंधनाचा खर्च मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे नजिकच्या काळात एसटीच्या सर्व गाड्या एलएनजी (लिक्विफाइड नॅचरल गॅस) वर चालविण्यात येतील, असेही रावते यांनी यावेळी सांगितले. यामुळे एसटीची सुमारे 800 कोटी रुपयांची बचत होणार असून प्रदूषणही कमी होण्यास मदत होईल.

एसटीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी योजना

एसटी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांसाठी यापूर्वीच वेतनवाढ जाहीर केली आहे. अधिकाऱ्यांसाठीही त्यांना यापूर्वी अंतरिम वाढ दिल्याच्या दिनांकापासून सातव्या वेतन आयोगातील २.६७ च्या गुणकाप्रमाणे वेतवाढ लागू करण्यात येत असल्याचे रावते यांनी जाहीर केले. याशिवाय अधिकाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करण्यात येत असल्याचे तसेच ग्रॅच्युइटीची मर्यादा २० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात येत असल्याचेही रावते यांनी सांगितले.