MSEDCL Cut off Power Supply : पाच लाखांची वीज थकबाकी असल्यानं महावितरणने तहसील आणि अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयाचा वीजपुरवठा खंडीत केला आहे. मात्र, ही कारवाई तहसील आणि अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. महावितरणच्या कारवाईनंतर महसूल विभागानं देखील जशास तसं उत्तर दिलं आहे. 69 लाखांचा अकृषक कर थकल्यानं अंबाजोगाई येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयाला महसूल विभागानं सील ठोकले आहे. त्यामुळं या दोन्ही कारवाईची जोरदार चर्चा रंगत आहे.


अखेर काल दिवसभरच्या या नाट्यमय घडामोडीनंतर रात्री तहसील कार्यालयाचा विद्युत पुरवठा पूर्ववत चालू करण्यात आला आहे. तर तहसील कार्यालयानं कार्यकारी अभियंत्यांच्या ऑफिसला लावलेले सीलसुद्धा काढले आहे. शासनाच्या दोन्ही विभागानं जशास तसे उत्तर दिल्यानं शासकीय कार्यालयांच्या एकमेकांवरील कुरघोडीची चर्चा अंबाजोगाई शहरात रंगली होती.




महावितरणची तहसील कार्यालयाकडे 3 लाख 94 हजार रुपयांची थकबाकी होती. तर उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे 85 हजार रुपये थकले होते. महावितरण कार्यालयाकडे अकृषक करापोटी थकलेल्या 68 लाख 84 हजार रुपयांची थकबाकीचा दाखला देत महसूल विभागानं देखील कार्यलयाला सील ठोकले होते. 




दरम्यान, मार्चअंडमुळं सर्वच विभाग सध्या वसुली करण्यावर जोर देत आहेत. महावितरणचे बीजविबालापोटीअंबाजोगाई कार्यालयाकडे 3 लाख 94 हजार रुपटे तर उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे 85 हजार रुपये थकले होते. यापैकी 1 लाख 37 हजारांच्या रकमेचा धनादेश काही दिवसापूर्वी महावितरणला देण्यात आला होता. तरीदेखली मोठी रक्कम थकीत असल्यानं कार्यकारी अभियंत्याच्या आदेशानं महावितरणच्या वसुली पथकानं तहसील आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयाचा वीजपुरवठा खंडीत केला. वीजपुरवठा खंडीत केल्यामुळे दोन्ही विभागातील कामकाज विजेअभावी ठप्प होते. महावितरणनं केलेली कारवाई महसूल विभागाच्या चांगलीच जिव्हारी लागल्यानं महसूल विभागानं देखील महावितरणला दणका दिला आहे. महावितरणकडे अकृषक कर थकल्यानं महसूल विभागाने देखील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाला सील ठोकले. दरम्यान, या दोन्ही कारवाईची बीड जिल्ह्यात चांगलीच चर्चा झाली.