इंदापूर : इंदापूरमधील एका शेतकऱ्याला तब्बल साडेसोळा हजारांचे बिल महावितरणनं दिलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या शेतकऱ्याकडे वीजेचं कनेक्शनंच नाही. त्यामुळे महावितरणच्या बेजबाबदार वागण्याच्या एका सामान्य शेतकऱ्याला चांगलाच शॉक बसला आहे.


इंदापूर तालुक्यातील बेडशिंगे गावातील मधूकर यादव व कल्पना यादव या दाम्पत्याची तीन एकर शेती आहे. या शेतीच्या सिंचनासाठी 2014 मध्ये महावितरणकडे अनामत रक्कम भरुन रीतसर वीज जोडणीची मागणी त्यांनी केली होती. तीन वर्षांच्या कालावधीत त्याना वीजेची जोडणी मिळाली नाहीच, मात्र त्यांच्या हाती तब्बल साडे सोळा हजारांचं बिल पडलं आहे.

त्यामुळे महावितरणचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. गेल्या तीन वर्षांत महावितरण कार्यालयात यादव दाम्पत्यानं वारंवार हेलपाटे मारले. मात्र त्यांना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही. उलट त्यांना खाजगी ठेकेदाराकडे जाण्याचा सल्ला दिला. यासाठी ठेकेदाराने त्यांना तीन पोल व तारांचा तब्बल 65 हजारांचा खर्च सांगितला होता.

दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसात हा प्रश्न मार्गी लावू असं सांगत, शेतकऱ्याला दिलासा देऊ असं सांगितलं आहे.