नाशिक : परदेशात हवामान खातं अचूक अंदाज देतं, मग आपल्याकडेच हवामान खात्याचे अंदाज का चुकतात असा सवाल विचारत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. आपण अवकाशात इतके उपग्रह सोडूनही अंदाज कसे चुकतात? असा प्रश्नच त्यांनी हवामान खात्याला विचारला आहे. चुकीच्या अंदाजांमुऴे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, यावरही अजित पवारांनी बोट ठेवलं आहे.
नाशिकमधील आपल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी हवामान खात्याच्या अंदाजाचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी भारतानं अवकाशात अनेक उपग्रह सोडले आहेत, तरीही हवामान खात्याला पावसाचा योग्य अंदाज का वर्तवता येत नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान काल शुक्रवारी बीड जिल्ह्यातील माजलगावच्या शेतकऱ्यांनी हवामान विभागाविरोधात तक्रार केली होती. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. माजलगावच्या शेतकऱ्यांनी एखाद्या चांगल्या वकिलाचा सल्ला घ्यावा आणि हवामान विभागावर गुन्हा दाखल करा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.