Mrug Nakshatra 2023 : हिंदू पंचांगानुसार वर्षभरात येणा-या 27 नक्षत्रांपैकी 9 नक्षत्रं ही पावसाची असतात. ‘नक्षत्रं आणि दरवर्षी त्यांची बदलणारी वाहनं’ ही अत्यंत मजेशीर आणि तितकीच संशोधनात्मक बाब आहे. पावसाच्या नक्षत्रांची सुरुवात ही जरी ‘रोहिणी’ नक्षत्रापासून होत असली, तरी पावसाच्या आगमनाचा खरा हर्षोल्हास हा ‘मृग’ नक्षत्रापासूनच सर्वत्र साजरा केला जातो. मृगशीर्ष नक्षत्राशी सूर्य आला की भारतात पावसाळा सुरू होतो. शेतकरी या वेळेला ‘मृग लागले’ असे म्हणतात. प्रत्त्येक नक्षत्राचे विशिष्ट वाहन असते यंदा मृग नक्षत्राचे वाहन हत्ती आहे. हत्ती हा संपन्नतेचे प्रतीक मानला जातो. 


‘मृग नक्षत्र’ हे आकाशमंडपातलं वैशिष्टयपूर्ण देखणं असं नक्षत्र मानलं जातं. युगानुयुगांपासून सामान्यत: 7 जूनला सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो असे मानले जाते. मात्र, यंदा सूर्य 8 जूनला मृग नक्षत्रात प्रवेश करतोय.


'ही' 9 आहेत पावसाची नक्षत्रं


भारत हा कृषिप्रधान देश असल्या कारणाने शेतीवर अनेक उद्योगधंदे अवलंबून असतात. पूर्वीच्या काळी आजच्यासारखे हवामानाचे अंदाज लावण्यासाठी उपग्रहीय तंत्रज्ञान नसल्याने निसर्गातील घटनांचे निरीक्षण करूनच पावसाचा अंदाज लावला जायचा. सूर्याचा आकाशातील भासमान मार्ग म्हणजे क्रांतीवृत्त. याच पार्श्वभूमीवर दिसणाऱ्या आकृत्यांना प्राचीन भारतीयांनी 27 नक्षत्रं म्हटलं आहे. या 27 नक्षत्रांपैकी मृग नक्षत्र, आद्र नक्षत्र, पुनर्वसू, उत्तरा नक्षत्र, पुष्य नक्षत्र, आश्‍लेषा नक्षत्र, मघा, पूर्वा नक्षत्र, उत्तरा नक्षत्र, हस्त नक्षत्र ही पावसाची नऊ नक्षत्रे आहेत.  


मृगनक्षत्राची सुरुवात कशी झाली?


हिंदू पंचांगाप्रमाणे, साधारणपणे पावसाच्या प्रत्येक नक्षत्राबरोबर त्याच्या वाहनाचा उल्लेख केला जातो. प्रत्येक नक्षत्रात पाऊस कमी-अधिक प्रमाणात पडतो. पावसाचं प्रमाण आधीच ठरवता यावं, अशी शेतक-यांची अर्थातच इच्छा असे. म्हणून काही पूर्वीच्या ज्योतिषांनी त्यासाठी काही ठोकताळे बसवले. त्यासाठी सूर्य नक्षत्र कोणत्या वाहनावर बसून येतं, ते शोधण्याचं त्यांनी एक गणित मांडलं. सूर्य नक्षत्रापासून दिवस नक्षत्रापर्यंतची नक्षत्रं ते मोजतात आणि त्या आकड्याला नऊ या संख्येने भागतात. बाकी शून्य आली, तर वाहन हत्ती असतं, बाकी एक आली तर ते वाहन घोडा, बाकी दोन आली तर कोल्हा असतं. तीन आल्यास बेडूक, चार आल्यास मेंढा, पाच आली तर मोर, सहा आली तर उंदीर, सात आली तर म्हैस आणि आठ आली, तर वाहन गाढव असा हा संकेत आहे.


या काळात कोकणातला शेतकरी मृग नक्षत्र सुरू होण्यापूर्वीच शेतीची साधनं, शेतीसाठी उपयुक्त असणारी अवजारं बाहेर काढून त्यांची दुरूस्ती, साफसफाई करून घेतो. कितीही कठीण काळ आला तरी शेतकरी राजा मृग नक्षत्राची आतुरतेने वाट पाहात असतो आणि त्याच्या स्वागतासाठी सज्ज असतो. 


यंदाचा पावसाळा कधी सुरू होणार?


मान्सून दरवर्षी मे च्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला केरळात पोहचतो. 7 जूनपर्यंत तो महाराष्ट्रात येतो आणि जुलै महिन्यापर्यंत तो संपूर्ण देशात पडतो. मात्र, यंदाचा मान्सून लांबण्याची शक्यता तज्ज्ञांकडून सांगितली जात आहे.


Important Days in June 2023 : 'वटपौर्णिमा', 'आषाढी एकादशी'सह विविध सणांची मांदियाळी, जून महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी