jalgaon news update : अनेक जण मंदिरात देव शोधण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु, जळगाव शहरातील मृणालिनी चौगुले यांनी अनाथ बालकांमध्ये देव शोधलाय. चौगुले यांनी गेल्या तीस वर्षांपासून अनाथ आणि गरजू मुलांसाठी स्वतःच्या हाताने स्वेटर विणून ते विनामूल्य वाटप करण्याचा उपक्रम राबलाय. 30 वर्षापूर्वी सुरू केलेला हा उपक्रम आजही सुरू आहे. चौगुले यांच्या या सामाजिक उपक्रमाचं संपूर्ण जळगाव जिल्ह्यात कौतुक होत आहे.
जळगाव शहरातील पत्रकार कॉलनी परिसरात मृणालिनी चौगुले राहातात. 85 वय असलेल्या चौगुले या राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्या म्हणून गेली अनेक वर्षं काम पाहातात. हे काम करत असताना गरजू आणि अनाथ बालकांना थंडीच्या दिवसात स्वेटरची आवश्यकता असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे मृणालिनी यांनी मुलानंसाठी सेवा म्हणून स्वेटर बनवून ते त्यांना विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला. गेल्या तीस वर्षांपासून त्यांनी अठरा ते वीस हजार स्वेटर नागपूर येथील राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून रामकृष्ण मिशन या संस्थेला पाठवले आहेत. या संस्थेचे माध्यमातून हे स्वेटर संपूर्ण राज्यभरातील गरजू आणि अनाथ बालकांना वितरित करण्यात येतात.
चौगुले यांनी गरजू महिलांनाही लोकरीपासून स्वेटर बनविण्याचे विनामूल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. निरागस लहान मुलांमध्ये देवाचे रुप आपल्याला दिसत असल्याने एक सेवा म्हणून आपण हे स्वेटर बनवण्याचे काम करीत आहोत आणि याचा आपल्याला खूप आनंद मिळत असल्याचे मृणालिनी चौगुले सांगतात. लहान बाळांना केवळ स्वेटरची नव्हे तर मायेची ऊब देणाऱ्या मृणालिनी चौगुले यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कोतुक होत आहे.
"आईला या कामात आनंद मिळतो. त्याबरोबरच ही ईश्वरी सेवा असल्याचं आम्ही मानत असल्याने या कामाचा कोणताही मोबदला न घेता हे स्वेटर विनामूल्य वितरित करीत असतो. आतापर्यंत तिने सोळा ते सतरा हजार स्वेटर बनून वितरित केले आहेत. लहान बाळांमध्ये देवाचे रूप पाहणाऱ्या आपल्या आईच्या आनंदात आम्हालाही खूप आनंद मिळत असल्याची भावना मृणालिनी चौगुले यांचे पुत्र सचिन चौगुले सांगतात.