मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या संयुक्त परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादेत एक वर्षांची शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा फायदा महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त परीक्षा तसेच गट-क सेवा संयुक्त परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या उमदेवारांना होणार आहे. या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. गट ब परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 रोजी तर गट क परीक्षा ही 4 मे रोजी घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त परीक्षा ही आठ ते नऊ महिन्यांपूर्वी, फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याच्या दरम्यान व्हायला हवी होती. ही जाहिरात डिसेंबर 2023 ची असल्याची माहिती आहे. पण परीक्षा उशीराने होत असल्याने अनेकजण त्यासाठी अपात्र ठरणार होते. अशा उमेदवारांना पात्र ठरवण्यासाठी वयोमर्यादेत एका वर्षांची शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त परीक्षा तसेच गट-क सेवा संयुक्त परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त परीक्षा तसेच गट-क सेवा संयुक्त परीक्षेसाठी एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे इतर परीक्षांना ही शिथिल वर्योमर्यादा लागू नसणार आहे.
काय म्हटलंय शासन निर्णयात?
शासन निर्णयान्वये दिनांक ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरांतीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४ अन्वये राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता राज्य शासकीय सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.
सदर अधिनियमातील तरतुदीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पदसंख्या व आरक्षण नमूद करुन मागणीपत्रे सुधारित करण्याची कार्यवाही आवश्यक आहे. याकरिता सुधारित मागणीपत्रानुसार जाहिराती प्रसिद्ध करण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन २०२४ च्या नियोजित वेळापत्रकापेक्षा साधारणतः ९ ते १० महिने विलंब झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक उमेदवारांनी शासन सेवेतील प्रवेशाकरिताची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडली असल्याने असे उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करण्यास अपात्र ठरत आहेत. यानुषंगाने कमाल वयोमर्यादेत शिथीलता देण्यावाबत निर्णय घेण्यासंदर्भात निवेदने शासनास प्राप्त झाली आहेत.
या पार्श्वभूमीवर अशा प्रकरणी कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय- प्रस्तावनेतील नमूद कारणांचा साधकबाधक विचार करुन या शासन निर्णयाद्वारे खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
१) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०१ जानेवारी, २०२४ ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत पदभरती करिता ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि त्या जाहिरातीच्या निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही, अशा जाहिरातीकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना संदर्भ क्र. (१) मधील सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २५.०४.२०१६ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत एक वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे.
२) ज्या पदांसाठी संबंधित पदांच्या सेवाप्रवेश नियमात विवक्षित कारणास्तव संदर्भाधीन दिनांक २५.०४.२०१६ मध्ये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे, अशा पदांसाठी विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत देखील सदर एक वर्ष इतकी शिथिलता देय राहील.
३) यामुळे जे उमेदवार अशा जाहिरातींकरिता अर्ज करण्यास पात्र होत आहेत, त्यांना अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी विहित कार्यवाही करावी.
४) सदर शिथिलता ही केवळ एक वेळची विशेष बाब म्हणून लागू करण्यात येत असून या शासन निर्णयानंतर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरीता संबंधित पदांच्या सेवाप्रवेश नियमात अथवा संदर्भाधीन क्र. (१) मधील दि.२५.०४.२०१६ च्या शासन निर्णयात विहित केलेली कमाल वयोमर्यादाच लागू राहील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४१२२०१९२७००४९०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI