MPSC Result : एमपीएससीकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा 2022 ची मेरिट लिस्ट (MPSC Merit List) जाहीर झाली असून त्यामध्ये विनायक नंदकुमार पाटील याने राज्यात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. तर धनंजय वसंत बांगर हा दुसरा आला आहे. मुलींमध्ये पूजा वंजारी हिने बाजी मारली असून प्राजक्ता पाटील ही दुसरी आली आहे. विशेष म्हणजे राज्यसेवेच्या 613 पदांसाठी गुरूवारी दुपारी मुलाखती घेण्यात आल्या आणि संध्याकाळी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली. आता उमेदवारांना 29 जानेवारी पर्यंत पसंतीक्रम द्यायचा आहे, त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल.
राज्यसेवेच्या 613 पदांसाठी 2022 साली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतून अंतिम जवळपास 1800 उमेदवार हे मुलाखतीसाठी निवडण्यात आले. या उमेदवारांच्या मुलाखतीचा शेवटचा टप्पा हा गुरूवारी पार पडला आणि त्याच दिवशी संध्याकाळी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली.
विद्यार्थांच्या एकच जल्लोष
एमपीएससीने मेरिट लिस्ट जाहीर केल्यानंतर पुण्यातील सदाशिव पेठ आणि इतर परिसरात विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. मूळचे करमाळ्याचे असणाऱ्या आणि पुण्यात अभ्यास करणाऱ्या निलेश भोसले यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, "एमपीएससीच्या निकालाने आपल्याला समाधान वाटलं. मेरिट लिस्टमध्ये वरच्या क्रमांकामध्ये नाव असल्याने अंतिम यादी नाव असेल हे नक्की. कुटुंबाने आणि मित्रांनी दिलेल्या साथीमुळे हे यश मिळवू शकलो."
उमेदवारांना पसंतीक्रम द्यावा लागणार
मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारांना आपला पसंतीक्रम द्यायचा आहे. 22 जानेवारी ते 29 जानेवारी या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना आपला पसंतीक्रम द्यायचा आहे. त्यानंतर या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचं एमपीएससीने म्हटलं आहे.
मुलांमधील पहिले तीन क्रमांक
1. पाटील विनायक नंदकुमार
2. बांगर धनंजय वसंत
3. गावंडे सौरव केशवराव
मुलींमधील पहिले क्रमांक
1. वंजारी पूजा अरूण
2. पाटील प्राजक्ता संपतराव
3. ताकभाते अनिता विकास
MPSC ने काय म्हटलंय?
राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-2022 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. प्रस्तुत परीक्षेची सदर सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची आहे. अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो आणि पर्यायाने उमेदवाराचा गुणवत्ता क्रम बदलू शकतो, उमेदवार अपात्र ठरू शकतो.
प्रस्तुत सर्वसाधारण गुणवत्ता यादी विविध मा. न्यायालयात / मा. न्यायधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणांवरील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आली आहे.
प्रस्तुत परीक्षेच्या अधिसूचित संवर्ग/पदासाठी पसंतीक्रम (Preference Number) विकल्प सादर करण्याकरिता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITES या मेनूमध्ये 'Post Preference' वेबलिक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेबलिक दिनांक 22 जानेवारी, 2024 रोजी दुपारी 2 वाजेपासून दिनांक 29 जानेवारी, 2024 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत सुरु राहील.
उमेदवारांकडून विहित पध्दतीने प्राप्त पसंतीक्रमाच्या आधारे अंतिम निकाल / शिफारशीसंदर्भात पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल :-
(1) वेबलिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व 23 संवर्गाकरीता 1 ते 23 मधील पसंतीक्रम अथवा No Preference' विकल्प निवडणे अनिवार्य आहे.
(2) अधिसूचित सर्व संवर्गाकरिता/ पदांकरिता 1 ते 23 मधील पसंतीक्रम निवडणा-या उमेदवारांचा त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार सर्व पदांवरील निवडीकरीता विचार होईल.
(3) अधिसूचित 23 संवर्गापैकी /पदांपैकी ज्या पदांवरील निवडीकरिता इच्छुक आहे; केवळ त्याच पदाकरिता पसंतीक्रम सादर करावेत, ज्या पदांवरील निवडीकरिता इच्छुक नाही; त्या पदांकरीता 'No Preference' हा विकल्प निवडावा
(4) संवर्गाचे पसंतीक्रम सादर केल्यानंतर 'Download PDF' हा पर्याय निवडून उमेदवारास सादर केलेले पसंतीक्रम जतन करून ठेवता येऊ शकतील.
(5) पसंतीक्रम सादर करणारे उमेदवार ज्या संवर्ग / पर्दाकरीता पसंतीक्रम ऑनलाईन पध्दतीने सादर करतील केवळ त्याच संवर्ग/पदांवरील निवडीकरीता त्यांचा विचार करण्यात येईल.
(3) विहित कालावधीनंतर संवर्ग / पदांचे पसंतीक्रम सादर करण्याची अथवा बदलण्याची उमेदवाराची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही.