मुंबई : एकीकडे राज्यातील जास्तीत जास्त मुले केंद्रीय सेवेत कसे जातील यासाठी प्रयत्न करणारे राज्य सरकार एमपीएससीच्या कारभाराकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न विचारला जात आहे. कारण एमपीएससीने परीक्षांच्या तारखांचा घोळाची परंपरा कायम ठेवल्याचं दिसतंय. कारण एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या समाजकल्याण विभागाची परीक्षा आणि राज्यसेवेची पूर्व परीक्षा ही IBPS Clerk परीक्षांच्या दिवशीच घेण्यात येणार आहे. येत्या 25 ऑगस्ट रोजी ही परीक्षा घेण्यात येणार असल्याने मुलांना एकतर IBPS Clerk किंवा एमपीएससी परीक्षा, यापैकी एक परीक्षा द्यावी लागणार आहे. 


IBPS ने जानेवारीतच तारीख जाहीर केली होती


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा ही 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही राज्यसेवेची ही परीक्षा या आधीच दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. त्याच दिवशी बँकिंगमधील IBPS Clerk परीक्षा होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आयबीपीएसने जानेवारी महिन्यातच या परीक्षेची तारीख जाहीर केली होती. त्याकडेही एमपीएससीने सरळ सरळ दुर्लक्ष केलं.


दुसरीकडे 18 ऑगस्ट रोजी एमपीएससीकडून समाजकल्याण विभागाच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही जाहिरात गेल्या वर्षीची असून परीक्षेची तारीख गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. पण त्याच दिवशी IBPS Clerk ची परीक्षाही नियोजित आहे.


 






एमपीएससीचा भोंगळ कारभार कायम


आधीच दोन वेळा एमपीएससीने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली आहे. आता तिसऱ्यांदा परीक्षेची तारीख जाहीर करताना त्या दिवशी इतर कोणत्या परीक्षा नियोजित आहेत की नाही हे पाहण्याची तसदीही घेतल्याचं दिसत नाही. या प्रकरणी विद्यार्थ्यांच्या अनेक संघटनांनी आवाज उठवला, अनेक राजकीय नेत्यांनी सोशल मीडियावरून प्रश्न मांडला. पण एमपीएससी असो वा राज्य सरकार, विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही.


कर्नाटकने परीक्षा पुढे ढकलली


विशेष म्हणजे, 25 ऑगस्ट रोजीच कर्नाटक राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा नियोजित होती. पण त्याच दिवशी IBPS Clerk परीक्षा असल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी ही परीक्षा पुढे ढकलली असल्याचं जाहीर केलं.


 






यंदा IBPS Clerk या पदासाठी मोठ्या प्रमाणावर जागा निघाल्या आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सुवर्ण संधी आहे. पण त्याच दिवशी राज्यसेवेचीही परीक्षा असल्याने कोणत्या तरी एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. 


IBPS Clerk परीक्षेसाठी महाराष्ट्रातून दरवर्षी लाखो विद्यार्थी अर्ज करतात. या परीक्षेच्या तारखा लक्षात घेऊन इतर राज्यांतील आयोग त्यांच्या परीक्षांच्या तारखा निश्चित करतात. पण एमपीएससीने मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष केल्याचं दिसतंय. 


एमपीएससीने आपला अट्टहास सोडला नाही तर राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे समाजकल्याण आणि राज्यसेवेच्या परीक्षांच्या तारखा बदलाव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.