Shrikant Shinde : कल्याण डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपामध्ये सुरु असलेल्या कलगीतुऱ्यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. मात्र खासदार शिंदे यांनी विरोधकाच्या आरोपाला उत्तर देताना  या परिसराच्या विकासासाठी आणखी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यावर आपला भर राहणार असून मी कामांच्या माध्यमातूनच बोलत असून ते लोकापर्यंत पोहचत आहे. विरोधक जे बोलतात ते बोलू द्या, त्यांना माझ्या कामातूनच उत्तर मिळेल अशा शब्दात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला .


ठाणे जिल्हा फुटबॉल असोसीएशनच्या वतीने राज्य स्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या समारोपासाठी रविवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे कल्याणात आले होते. भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी असल्याचा आरोप केल्यानंतर खासदार प्रथमच या परिसरात आल्याने ते विरोधकाच्या आरोपाचा कसा समाचार घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. विरोधकांना आक्रमक होत उत्तर देत नव्या वादाला तोंड फोडण्यापेक्षा खासदार डॉ. शिंदे यांनी विरोधकाचे आरोप फुटबॉलच्या मैदानावर खिलाडूवृत्तीनेच परतवले.


उद्धव ठाकरे सरकारच्या काळात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआररिजनमध्ये विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या भागातील रस्ते, पूल, उड्डाणपूल ही कामे वेगाने सुरु आहेत.  येणाऱ्या काळात आणखी निधी कसा आणता येईल यावर आपला भर राहणार आहे. विरोधकांना माझ्या कामातूनच उत्तर मिळेल, कारण मी कामातून जे बोलतोय ते लोकापार्यंत पोहचत आहे. विरोधकांना जे आरोप करायचे ते करू द्या, असे सांगत वादावर पडदा टाकला. तर जिल्ह्यातील प्रत्येक शहरात फुटबॉलसाठी स्वतंत्र मैदान यासह अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असून चांगले खेळाडू घडविण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले  सांगितले.


संत सावळाराम म्हात्रे स्मारक उभारणार -  श्रीकांत शिंदे
डोंबिवली कल्याण ही सांस्कृतिक नगरी आहे, त्याचबरोबर  संत सावळाराम महाराजांना मानणारा वर्ग या भागात राहतो. या वारकरी समाजाच्या वतीने सावळाराम महाराजाचे स्मारक उभारण्याची मागणी करण्यात आली असून महापालिकेच्या माध्यमातून पाच एकर पेक्षा जास्त जागा उपलब्ध करून घेत सावळाराम महाराजाचे मोठे स्मारक उभारण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन खासदार शिंदे यांनी दिले.