सोलापूर : माझ्या राजीनाम्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी उद्याच राजीनामा देतो, अशी  उद्विग्न प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर त्यांनी राज्य दौरा सुरु केला असून आज ते सोलापुरात होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की,  28 मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते यांच्यासोबत एकत्रित बैठक करणार आहोत. हा दौरा कोणत्याही सरकारविरोधात किंवा पक्षाविरोधात नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 


खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, ओबीसी समाजाचे ज्येष्ठ लोक भेटले त्यांनी मला चांगला मार्ग सांगितला. मराठा समाजाची दिशाभूल होऊ नये यासाठी दौरा करतोय.  लोकांना काय वाटतेय यापेक्षा कायदा काय आहे हे पाहणे गरजेचे आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठीच मी हा दौरा सुरु केलाय, असं ते म्हणाले. 


ते म्हणाले की, राज्य आणि केंद्र सरकारने काय भूमिका घ्यायची ते पहावे लागेल. सारथी संस्थेची दुरवस्था किंवा वसतिगृहाचे प्रश्न प्रलंबित आहेत त्याचे काम राज्याने करावे, असंही  खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले. 


त्यांनी म्हटलं की, माझी भूमिका पक्षाची नाही तर समाजाची आहे. घराण्याचा वंशज म्हणून समाजाचा घटक म्हणून मी भूमिका घेतोय. या विषयावर भारताच्या इतिहासात संसदेत पहिल्यांदा आंदोलन करणारा मी पहिला खासदार आहे, असंही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालाने सांगितले आहे सप्टेंबर 2020 पुर्वीच्या नियुक्त्या राज्य सरकारने कराव्यात, असंही त्यांनी सांगितलं.


राज्यातील काही भागांचा दौरा करणार


मराठा समाजाची भूमिका आणि समाजाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आपण राज्यातील काही भागांचा दौरा करणार आहोत, असं खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलं आहे. तसेच मराठा आरक्षण प्रश्नाविषयी मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली जाईल, असंही ते म्हणाले. 27 मे रोजी खासदार संभाजीराजे मुंबईत असणार आहेत. त्यादिवशी सकाळी किंवा दुसऱ्या दिवशी संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेची शक्यता आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. कोरोना संकटात जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे मराठा समाजानं संयम बाळगावा असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं आहे.