मुंबई : इंडियन आयडॉलचा सध्याचा नवा सीझन सातत्याने चर्चेत येतो आहे. काही दिवसांपूर्वी किशोरकुमार यांच्या गाण्यावर झालेल्या शोबद्दल अमितकुमार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर या स्पर्धेचा पहिला विजेता अभिजीत सावंत यानेही सध्या हा शो गाण्यापेक्षा प्रेमप्रकरणावर जास्त केंद्रित झाल्याची टीका केली होती. आता या शोचा होस्ट आदित्य नारायणच्या एका टिप्पणीने पुन्हा एकदा नवा वाद उद्भवला आहे. 


सध्या या शोचं चित्रिकरण दमण इथे सुरू आहे. रविवारी झालेल्या कार्यक्रमात आदित्य नारायणने अलिबाग से आया हूं क्या.. अशा अर्थाची टिप्पणी केली. साहजिकच यामुळे अलिबागकर नाराज झाले आहेत. याची दखल मनसे चित्रपट सेनेच्या अमेय खोपकर यांनी घेतली आणि त्यांनी तातडीने फेसबुक लाईव्ह करवी काही गोष्टी सांगितल्या. या लाईव्हमध्ये ते बोलल्यानुसार त्यांनी या शोबद्दल नाराजी व्यक्त केली. इतकंच नव्हे, तर ज्या मंचावरून हे वाक्य बोललं गेलं, त्याच मंचावरून त्याची माफीही मागितली गेली पाहिजे असा आग्रह धरला आहे. या लाईव्हमध्ये खोपकर यांनी आपलं बोलणं आदित्य यांचे वडील प्रख्यात गायक उदित नारायण यांच्याशीही झाल्याचं सांगितलं आहे. 


याबद्दल माहिती देताना खोपकर म्हणाले, आदित्यच्या या वाक्याबद्दल मी उदित नारायण यांच्याशी बोललो आहे. गेल्या काही महिन्यांपासून आदित्यच्या अनेक तक्रारी येऊ लागल्या असल्याची कल्पना मी त्यांना दिली आहे. आपल्या मुलाला त्यांनी तशी कल्पना द्यावी याबद्दलही हे बोलणं झालं असल्याची माहीती त्यांंनी दिली. शिवाय, अलिबागकरांचा हा अपमान यापूर्वीही झाला आहे. वारंवार याबद्दल कल्पना देऊनही अलिबागकरांचा अपमान केला जातो आहे. आधी विनंती मग ताकीद आणि शेवटी कानाखाली आवाज अशी आपल्या कामाची पद्धत असते. आता पहिल्या दोन गोष्टी आपण केलेल्या आहेत. यापुढे असं काही झालं तर थेट कानाखालीच वाजवली जाईल याची नोंद सर्वांनी घ्यावी असा इशाराही खोपकर यांनी दिला. 


अलिबागकरांना यामुळे नाहक मनस्ताप झाला आहे याची कल्पना आपल्याला असून आपल्याला जे शक्य आहे ते आपण करू याची ग्वाहीही खोपकर यांनी दिली आहे.