सचिनने स्थानिक विकास निधीतून, येवल्यातील समता प्रतिष्ठानच्या मायबोली निवासी कर्णबधीर विद्यालयाला तब्बल चाळीस लाखांचा निधी दिला आहे.
येवल्यातील अंगणगाव येथील समता प्रतिष्ठान संचिलत मायबोली निवासी शाळा गेल्या 21 वर्षांपासून कार्यरत आहे. जिल्हयातील ही दुसरीच निवासी शाळा असून, या ठिकाणी 110 विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र केवळ 40 विद्यार्थ्यांना शासकीय अनुदान मिळते. उर्वरीत मुलांच्या गरजा भागविण्यासाठी संस्थेला लोकाश्रयाची मदत घ्यावी लागते.
या मुलांच्या आयुष्याला आकार देण्यासाठी, त्यांना त्यांच्या पायावर उभे कसे राहता येईल, यासाठी स्वयंरोजगार, व्यवसाय प्रशिक्षण आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी समता प्रतिष्ठानतर्फे अपंग पुनर्वसन प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी इमारत बांधण्याचे काम सुरु आहे.
समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीतून ही इमारत उभारण्यात येत आहे. त्यासाठी कवी अरुण म्हात्रे यांच्या माध्यमातून सचिनचा भाऊ नितीन तेंडुलकरला संस्थेची माहिती देण्यात आली. त्यानंतर संस्थाचालकांनी खासदार सचिनकडे त्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला.
काही दिवसांपूर्वी मास्टर ब्लास्टरने थेट चाळीस लाखाच्या मदतीचे पत्रच जिल्हाधिकाऱ्यांना पाठविल्याने संस्थाचालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
यापूर्वी सचिनने उस्मानाबादमधील डोंजा हे गाव दत्तक घेतलं आहे.