पंढरपूर : प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमला महाआघाडीत सोबत घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. यासंदर्भात पुढच्या आठवड्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.


भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरही काँग्रेससोबत जाण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. दरम्यान, काँग्रेसला प्रकाश आंबेडकर यांची अडचण नाही, पण एमआयएमला सोबत घेण्यावरुन काँग्रेस नेत्यांमध्ये नकाराची भावना आहे. त्यामुळे राजू शेट्टींची मध्यस्थी फळाला येते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सर्वच विरोधकांची एकजूट सुरू झाली आहे. काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या आघाडीला आपण एकत्र आणत असल्याचे राजू शेट्टी यांनी आज पंढरपूरात सांगितले. या संदर्भात प्रकाश आंबेडकरांसोबत दोन-तीन बैठका झाल्या असून त्यांनी सकारात्मक पावले टाकण्याचे संकेत दिले आहेत. पुढच्या आठवड्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


उद्धव ठाकरे यांनाही सोबत येण्याचे आवाहन करताना शेट्टी म्हणाले की, उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी भाजपच्या विरोधात संघर्ष करतात. त्यांनी सत्तेतून बाहेर पडून भाजपाला सत्तेपासून खाली खेचण्यासाठी आमच्यासोबत यावे.


"हे शेतकऱ्यांविरोधात कारस्थान"


राज्य सरकारने दुष्काळसदृश शब्द वापरून पुन्हा शेतकऱ्यांच्या विरोधात कारस्थान सुरु केले आहे. दुष्काळ सदृश्य शब्द हा कर्जमाफीप्रमाणेच फसवा असून शेतकऱ्यांना दुष्काळाच्या नावावर पुन्हा फसवण्याचा प्रयत्न सरकार करू लागल्याचेही राजू शेट्टी यांनी सांगितले.