मुंबई: महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ठिकठिकाणी तुफान राडेबाजी पाहायला मिळत आहे. मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये नाराज कार्यकर्त्यांनी राडेबाजी केली.

नाशिक -

  • शिवसेनेच्या एबी फॉर्म वाटपात गोंधळ, प्रभाग 4 मध्ये एबी फॉर्म न पोहोचल्याने 4 उमेदवार पुरस्कृत करण्याची सेनेवर नामुष्की

  • तर 28, 29 सह 3 क्रमांकाच्या प्रभागात डबल एबी फॉर्म दिले गेल्याने गोंधळ


पुणे -

  • पुण्यातील भाजप कार्यालयाबाहेर शहाराध्यक्ष योगेश भोगले यांच्या फोटोला नाराज कार्यकर्त्यांनी काळ फासलं

  • इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने कार्यालयाबाहेर गर्दी, पोलीस बंदोबस्त वाढवला


पिंपरी चिंचवड -


  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आरपीआयने भाजपसोबतची युती तोडली, स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

  • फक्त 3 जागा दिल्याने आरपीआय नाराज


सोलापूर -

  • काँग्रेसने सर्व 102 जागांवर उमेदवार दिले, तर राष्ट्रवादी 62 जागा लढवणार

  • उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना एबी फॉर्म मिळाले


 ठाण्यातील सर्वात मोठी बंडखोरी

  • शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक बाळा घाग आणि पत्नी संगीता घाग यांनी राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्ज भरला.

  • पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांना उमेदवारी दिल्याने नाराज


नागपूर

  • नागपूर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तिकीट वाटपावरुन नाराजी

  •  तोडफोडीची शक्यता गृहीत धरून काँग्रेस नेत्यांच्या घरावर पोलिस बंदोबस्त लावले.

  • काँग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या घरासमोर तगडा बंदोबस्त.


अकोला -

  • महापालिकेतील काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका उषा विरक यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

  • २५ वर्षांपासून महापालिकेत नगरसेविका

  • २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मतदारसंघातून होत्या काँग्रेस उमेदवार

  • स्वत:सह पतीसाठी मागितली होती काँग्रेसकडे उमेदवारी

  • पक्षानं उमेदवारी नाकारल्यानं राष्ट्रवादीत  प्रवेश.


अटकेतल्या आरोपीचा उमेदवारी अर्ज

पिंपरीत अटकेतल्या आरोपीचा उमेदवारी अर्ज, अरविंद साबळे बसपाकडून रिंगणात, साबळेवर झोपडपट्टी दादा कायद्याअंतर्गत गुन्हा

नाशिक ब्रेकिंग -
- शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे यांचे चिरंजीव ऋतुराज पांडे आणि भावजय कल्पना पांडे यांना भाजपकडून उमेदवारी.  शिवसेनेत राडा झालेल्या पांडे कुटुंबीयांची बंडखोरी. शेवटच्या क्षणी भाजपात प्रवेश.

ऋतुराज पांडेने प्रभाग 13 मधून तर कल्पना पांडे यांनी प्रभाग 24 मधून भाज तर्फे ab फॉर्म घेतल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी एबीपी माझाला दिली.

अकोला - भाजपने महापौर उज्वला देशमुख यांचं तिकीट कापलं. प्रभाग 6मधील खुल्या गटातील जागेसाठी महापौरांनी तिकीट मागितलं होतं.मात्र महापौरांना डावलत नगरसेविका सारीका जैस्वाल यांना उमेदवारी.
गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील आणि खासदार संजय धोत्रे वादाचा महापौरांना फटका.
महापौर उज्वला देशमुख या डॉ. रणजीत पाटील यांच्या समर्थक.

भाजप आणि मित्रपक्षांचा जागा वाटपाचा तिढा सुटला

मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि मित्रपक्षांचा जागा वाटपाचा तिढा सुटला. भाजप, रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला. या फॉर्म्युल्यानुसार भाजप 192 जागा, आरपीआय 25, रासप 6 आणि शिवसंग्रामच्या 4 जागा लढवणार आहे.

कालच भाजपनं आपल्या 195 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यामुळं अवघ्या 35 जागांवर तीन मित्रपक्षांना समाधानी करण्याचं आव्हान भाजप नेत्यांसमोर होतं. पण, भाजपनं हे आव्हान लिलया पेललं. त्यामुळं 35 जागांवर लढणारे मित्रपक्ष इतर जागांसाठी भाजपच्या किती कामी येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुंबईत दिवसभरात काय घडलं?


पुण्यात आमदार पत्नीची बंडखोरी

#पुणे- राष्ट्रवादी आमदार अनिल भोसलेंच्या पत्नीची बंडखोरी,  रेश्मा भोसले यांना भाजपकडून उमेदवारी

ज्योत्स्ना कुलकर्णी कुटुंब उपषणोला

तिकीट नाकारल्याने भाजपच्या ज्योत्स्ना कुलकर्णी कुटुंब आणि कार्यकर्त्यांसह भाजपच्या पक्षकार्यालयाबाहेर उपोषणाला. बॅनर तयार करुन उपोषणाची बैठक. ज्योत्स्ना कुलकर्णींचं कुटुंब राष्ट्रीय स्वयंवसेवक संघाचे जुने कार्यकर्ते. पालकमंत्री गिरीष बापटांवर टीका.

पुणे भाजपच्या पक्षकार्यालयाबाहेर आणखी काही तिकीट न मिळालेले कार्यकर्ते उपोषणात सहभागी. भाजपच्या महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्षा डोक्टर अपर्ना गोसावी या देखील उपोषणात सहभागी.

ठाण्यात भाजपा आरपीआय युती तुटली
20 जागांची मागणी असताना आरपीआयला6 जागा दिल्या होत्या. आता त्या जागीदेखील भाजपाने उमेदवार दिले. त्यामुळे आरपीआय स्वतंत्र निवडणूक लढणार

नागपुरात घोषणाबाजी

नागपुरात गडकरी वाड्यासमोर नाराज महिलांनी थेट नितीन गडकरी आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बानवकुळेंसमोर घोषणाबाजी केली.

भाजप कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे सकाळी उमेदवारांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराजांनी गोंधळ घातला. तर काहींनी या उमेदवार यादीतल्या नावांवर आक्षेप घेतला.

प्रभाग 32 मधून मंगला मस्के यांना तिकीट न मिळाल्यानं महिला समर्थकांनी गडकरी आणि बावनकुळे यांच्यासमक्ष नाराजी व्यक्त केली. त्याआधी श्रीकांत आगलावे यांना उमेदवारी न मिळाल्यानं त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला.

तर प्रभाग 24 मधून चेतना टांक यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं त्यांच्या विरोधक महिलांनी गडकरी वाड्याबाहेरच नाराजी व्यक्त केली.

भाजप कमळ चिन्हावरच लढणार

दरम्यान,  नागपूरमधील सर्व 151 जागांवर भाजप कमळ या चिन्हावरच निवडणूक लढणार आहे.. भाजपनं बहुजन रिपब्लिकन एकता मंच आणि रिपाईच्या आठवले गटाला काही जागा सोडल्या आहेत.. मात्र त्यांनाही कमळ या चिन्हावरच लढण्याची अट घातली आहे.

ठाण्यात भाजपची हाणामारी

ठाण्यात काल रात्री तिकीट वाटपावरुन झालेली धक्काबुक्की ताजी असताना ठाण्याच्या भाजप कार्यालयात आज पुन्हा एकदा हाणामारी झाली आहे. या हाणामारीमध्ये एकजण जखमी झाला असून घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, काल रात्री राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याचं बोललं जात आहे.

नाशिक शिवसेनेत राडा

नाशकात शिवसेनेच्या 2 गटात तुफान गोंधळ पाहायला मिळाला.चांडक सर्कलमध्ये तिकिट वाटपावरुन 2 गट आमनेसामने आलेत. शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्तेंना विरोधकांनी मारहाण केली.

यामुळे माजी महापौर विनायक पांडे आणि बोरस्ते समर्थक एकमेकांना भिडले. विशेष म्हणजे राडा इतका जास्त होता की पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

भाजपमध्येही अर्वाच्च शिवीगाळ

नाशकातही भाजपच्या इच्छुकांनी मोठा गोंधळ घातला. निष्ठावतांना डावलल्यानं कार्यकर्त्यांची नाराजी उफाळून आली आहे.

शहाराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी पैसे देऊन तिकिट विकल्याचा आरोप नाराजांनी केला.

विशेष म्हणजे काही जणांनी उमेदवारीसाठी आत्मदहन करण्याचाही इशारा दिला. अनेकांनी सानपांना अर्वाच भाषेत शिवीगाळ केली.

त्यामुळे वैतागलेल्या बाळासाहेब सानपांनी नाईलाजानं भाजप कार्यालयतून काढता पाय घेतला.

अमरावतीत काँग्रेस शहराध्यक्षाला मारहाण

अमरावतीत तिकीट वाटपावरुन झालेल्या वादात काँग्रेस शहराध्यक्षाला मारहाण झाली.

काँग्रेस उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच ही मारहाणीची घटन घडली. शहराध्यक्ष संजय अकर्ते यांनी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ही मारहाण केल्याचं सांगितलं. याप्रकरणी  अकर्ते यांच्या तक्रारीवरुन पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पुण्यात अर्ज भरण्यासाठी गर्दी

महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पुण्याच्या क्षेत्रिय कार्यालयात एकच गर्दी पहायला मिळतेय. बहुतेक पक्षांनी उमेदवारांना अद्याप एबी फॉर्म दिलेले नाहीत. त्यामुळे क्षेत्रिय कार्यालयात गोंधळाचं वातावरण आहे.

दरम्यान, ऐनवेळी एबी फॉर्म मिळाल्यास अर्ज भरता यावा यासाठी सर्व उमेदवार तयारीनिशी क्षेत्रीय कार्यालयात दाखल झालेत. तसेच उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करण्याचा मनोदयही काहींनी बोलून दाखवलाय.

मिरजेत राजू शेट्टींची काँग्रेसला साथ

सांगलीच्या मिरज पश्चिम भागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी युती करण्याचे भाजप नेत्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरलेत. त्यामुळे नाराज झालेल्या राजू शेट्टींनी काँग्रेसचं बोट पकडलं. सोबतच वाळवामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना विकास आघाडीसोबत तर जत तालुक्यात स्वबळावर लढणार आहेत.

सोलापुरात भाजप उमेदवाराचा गोंधळ

सोलापुरात निवडणूक कार्यालयात भाजपच्या उमेदवाराने चांगलाच गोंधळ घातला. प्रभाग क्रमांक सहाचे भाजपचे उमेदवार हेमंत पिंगळे यांनी पोलिसांच्या नाकी नऊ आणले. उमेदवारी अर्ज भरताना कार्यकर्त्यांनाही कार्यालयात येऊ द्यावं यासाठी त्यांनी सुरुवातीला हुज्जत घातली. तेव्हा जास्तीच्या कार्यकर्त्यांना आत घेऊन जाता येणार नाही असं पोलिसांनी सांगितलं.

तेव्हा नाराज झालेले हेमंत पिंगळेंनी गोंधळ घातला आणि थेट एका पोलिस कर्मचाऱ्यावरच धाऊन गेले.. शेवटी भाजपचे उमेदवार हेमंत पिंगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.. या गोंधळानंतर महापालिकेच्या निवडणूक आयुक्तांनी पिंगळेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत.

नागपूरमध्ये शिवसेनेकडून आरोपीला तिकीट

गुंडांच्या इनकमिंगवरुन भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या करणाऱ्या शिवसेनेला गुन्हेगारांची अॅलर्जी नसल्याचं दिसतंय. कारण नागपूरमध्ये भाजपने तिकीट नाकारलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अनिल धावडेला शिवसेनेनं तिकीट दिलंय.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने विद्यमान नगरसेवक असूनही भाजपने धावडेला तिकीट नाकारलं मात्र लगेचच शिवसेनेने त्याला पक्षात डेरेदाखल करुन घेत प्रभाग क्रमांक 22 मधून त्याला उमेदवारी दिलीय.

महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत

एकीकडे उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरु असताना दुसरीकडे महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत पार पडली. आज 27 महानगर पालिकांसाठी महापौरपदांचं आरक्षण जाहीर करण्यात आलं.. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी प्रवर्गासाठी एकुण 11 महापालिकांचे महापौरपद आरक्षीत असेल.. तर  तब्बल 14 महापालिकांमधील महापौरपद विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असणार आहे.

 पदवीधर मतदारसंघासाठी चुरशीने मतदान

अमरावती विभागातील पदवीधर मतदार संघासाठी अकोल्यात सकाळपासूनच मतदानास सुरुवात झाली. इथं भाजपकडून राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे संजय खोडके, बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचे डॉ. दीपक धोटे तर श्रीहरी अणेंच्या विदर्भ राज्य आघाडीचे डॉ. अविनाश चौधरी निवडणूक लढत आहेत. डॉ. रणजीत पाटलांनी आज सकाळी नऊच्या सुमारास आपला मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय अकोल्याचे खासदार संजय धोत्रेंनीही आपल्या परिवारासह मतदान केलं.