Dhananjay Mahadik on Satej Patil : टोलमाफियांनी टोल संदर्भात आंदोलन करणं हे हास्यास्पद आहे, अशी टीका भाजपचे नेते आणि खासदार धनंजय महाडिक (MP Dhananjay Mahadik) यांनी काँग्रेसचे नेते सतेज पाटील (Satej Patil) यांच्यावर केली. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावर टोल माफ करण्यासंदर्भात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनावरून धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. कोल्हापुरातील टोल आंदोलनादरम्यान कुणी टोलची पावती फाडली होती, हे कोल्हापूरकरांना (Kolhapur) माहिती असल्याचे महाडिक म्हणाले.
सतेज पाटलांकडून कोल्हापूरकरांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचं काम
सतेज पाटील हे विधानसभेच्या तोंडावर केवळ स्टंट करत असल्याचा आरोप देखील धनंजय महाडिक यांनी केला आहे. कोल्हापूरकरांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचं काम सतेज पाटील करत आहेत. मात्र कोल्हापूरची जनता सुज्ञ असल्याचे धनंजय महाडिक म्हणाले.
सतेज पाटील यांनी नकारात्मक कथानक रचण्याचा प्रयत्न केला
टोलनाक्यावर आंदोलन करुन सतेज पाटील यांनी नकारात्मक कथानक रचण्याचा प्रयत्न चालवला आहे. कोल्हापुरात टोल आंदोलन झाले तेव्हा त्यांनी स्वतः टोल आकारणीची पावती केली होती. टोलमध्ये अर्थपूर्ण व्यवहार करण्यासाठीच त्यांनी पावती फाडली होती, असा आरोप त्यांनी केला. भाजप-शिवसेना सरकारने रस्ते करणाऱ्या कंपनीचे पैसे अदा करून कोल्हापूरकरांना टोल माफी दिली होती. रस्ते खराब असतीलल तर टोल आकारणी करू नये या भूमिकेशी मी सहमत आहे, असेही ते म्हणाले.
एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे खड्डे त्यामुळं काँग्रेसचं आंदोलन
टोल माफ व्हावा, टोलमध्ये सवलत मिळावी, यासाठी काल (3 ऑगस्ट) काँग्रेसनं मोठं आंदोलन केलं. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेसंदर्भात काँग्रेसने ही आंदोलनाची हाक दिली होती. महत्त्वाचं म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यासह काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व बडे नेते एका एका टोल नाक्यावर उभं राहून हे आंदोलन करण्यात आलं. आपआपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे नेते आंदोलनात उतरले होते. पुणे- कोल्हापूर नॅशनल हायवेचं काम गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. सद्यपरिस्थितीत प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे. एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे खड्डे अशी परिस्थिती आहे. रस्त्याचं काम वेळेत होत नाही. त्यामुळे काँग्रेसने प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आंदोलन केल्याचे पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: