मुंबई : राफेल विमान खेरदी हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. संसदेत आणि संसदेबाहेर राफेल करारावर वारंवार खोटे बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेची आणि देशातील 130 कोटी जनतेची फसवणूक आणि विश्वासघात केला आहे. तसेच देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा अवमान केला आहे.


पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत. तसेच संयुक्त संसदीय समितीमार्फत या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी यावेळी केली. या मागणीसाठी काँग्रेस 27 सप्टेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.


राष्ट्रीय सुरक्षेला ढाल बनवून मोदी राफेल घोटाळा लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे दुर्दैवी आहे. मोदींचा भ्रष्ट चेहरा या प्रकरणातून समोर आला आहे. 'चौकीदार ही भागीदार है' हे सिध्द झाले आहे.


पत्रकारपरिषदेत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, मोदींना देशहितापेक्षा त्यांच्या उद्योगपती मित्रांचा फायदा महत्त्वाचा आहे. मोदी त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठीच देश चालवत आहेत, हे पुन्हा एकदा राफेल घोटाळ्यावरून सिध्द झाले आहे. देशाच्या सैनिकांची सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेला बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनिल अंबानींच्या फायद्यासाठीच राफेल डील बदलली हे स्पष्ट झाले आहे.


काँग्रेस सरकारने एका राफेल विमानाची किंमत 526.10 कोटी निश्चित केली होती, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुनी डील रद्द करून राफेल विमानाची किंमत 1670.7 कोटी ठरवून राफेल खरेदीचा करार केला. या नव्या डीलमध्ये 41 हजार 205 कोटी रूपये जास्त मोजले. या बदल्यात अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स या 10-12 दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या कंपनीला 30 हजार कोटींचे कंत्राट दिलं गेलं.




संबंधित बातम्या


फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष मोदींना चोर म्हणाले, राहुल गांधींचा आरोप


राफेल विमान करार : भारताने फक्त रिलायन्सचं नाव सुचवलं : ओलांद


काँग्रेस-भाजप वादात कळीचा मुद्दा ठरलेला राफेल करार काय आहे?