सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आल्याची घटना घडली आहे. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना ही घटना घडली आहे. या घटनेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा अमोल कोल्हे यांनी निषेध केला. भाजपच्या पदाधिकाऱ्याने हा भ्याड हल्ला केला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण द्यावं असे कोल्हे म्हणाले.
भाजपच्या पदाधिकाऱ्याने भ्याड हल्ला केला, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं : अमोल कोल्हे
गेली अनेक वर्ष पुरोगामी विचार मांडणारे, सर्वसामान्य बहुजन तरुणांच्या डोळ्यात उद्योजकतेची स्वप्न पेरण्याचे काम प्रविणदादा करत आहेत. त्यांची वैचारीक बैठक आहे, एक विचारधारा आहे. खूप वाचनातून आणि चिंतनातून ती समोर आली आहे. तुमचे त्यांच्याशी वैचारीक मतभेद असू शकतात. पण त्यांच्यावर ज्या पद्धतीने हल्ला झाला हा भ्याड आहे. ज्यांनी हे कृत्य केले तो भाजपचा पदाधिकारी असल्याचे कोल्हे म्हणाले. याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्षाने दिले पाहिजे असे कोल्हे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी कोल्हे यांनी केली. कोणत्याही आरोपीला पाठिशी घालू नये असे कोल्हे म्हणाले. प्रविणदादा यांच्यावर झालेला हल्ला हा वैचारीक दिवाळखोरीचं लक्षण असल्याचे कोल्हे म्हणाले.
शाई फेक करणारा दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक करणारा दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी आहे. दीपक काटे हा भाजप युवा मोर्चाचा प्रदेश सचिव असल्याची माहिती मिळाली आहे. दीपक काटे याच्या फेसबुक अकाउंटवर देखील भाजप पदाधिकारी असल्याचा उल्लेख आहे. तर भाजपचा गमजा घातलेला दीपक काटे याचा फोटो देखील समोर आला आहे.
हल्लेखोरांना पकडून कठोर शिक्षा करा अन्यथा...मनोज आखरेंनी दिला इशारा
प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध. हल्लेखोरांना पकडून कठोर शिक्षा करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲड मनोज आखरे यांनी केली आहे.नाही तर संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईल उत्तर देईल. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की त्यांना जशास तसा धडा शिकवावा.
खरा इतिहास सांगणाऱ्यांवर हल्ले केले जात आहेत : विकास पासलकर
प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घरात घरात पोहोचवण्याचं काम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रवीण गायकवाड यांनी केले आहे. खरा इतिहास सांगणाऱ्यांवर हल्ले केले जात आहेत आणि विकृती सांगणाऱ्यांना अभय दिला जातोय. तुम्ही जी विकृती तयार कराल ती ठेचण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आज जो प्रकार घडला आहे त्याला योग्य तेच उत्तर आम्ही देणार असल्याचे मत मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विकास पासलकर यांनी व्यक्त केले. विचाराचा लढा विचाराने देऊ. तुम्ही जर कायदा हातात घेणार असाल तर याला सुद्धा आम्ही आमच्या भाषेत उत्तर देऊ असे पासलकर म्हणाले.
विघातक कृती करणारी माणस भाजपने पोसली आहेत : रेखा कोंडे
प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला आहे. हल्ला करणारा भाजपच्या युवा मोर्चाचा दीपक काटे नावाचा नालायक माणूस होता त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. गायकवाड यांचे मराठा समाजाचे विषयच काम कोणीही विसरणार नाही. विचारधारा वेगळ्या असल्या तरी ते सांगण्याची आणि मांडण्याची पद्धत वेगळी आहे, त्या सगळ्याला फाटा देऊन अशाप्रकारे विघातक कृती करणारी माणस भाजपने पोसली आहेत. अशा विघातक कृत्य करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे असे मत मराठा महासंघाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रेखा कोंडे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या: