मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठणार असल्याचे सूचक विधान पालकमंत्री विजय वडेट्टीवार यानी केलं आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी उठवण्याबाबत हालचालींना वेग आला आहे. याबाबत नुकताच राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, पोलीस महासंचालक आणि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत चंद्रपूर आणि गडचिरोली येथील दारू बंदीबाबत अभ्यास करण्यासाठी दोन समित्या नेमण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त यांच्या स्तरावर एक समिती राहील. ही समिती चंद्रपूर आणि गडचिरोली येथील दारूबंदी, अवैध दारू विक्री, महसुलात झालेली घट, दारू बंदी झाल्यावर जिल्ह्यातील गुन्हे यावर सर्व बाबीवर अहवाल देणार आहेत. ही समिती एक महिन्यात त्यांचा अहवाल देणार आहे. शासकीय आणि अशासकीय लोक या समितीत असणार आहेत. या समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर शासनाकडून एक समिती याचा अभ्यास करणार आहे. शासनाच्या समितीत आमदार, मंत्री, सचिव यांचा समावेश असणार आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि पन्हाळ गड सात महिन्यांनी पर्यटकांसाठी खुला!
राज्य उत्पादन शुल्क अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने दिलेल्या अहवालावर शासन समिती त्यावर अभ्यास करणार आहे. नंतर त्यावर सरकार धोरणात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे एकूणच चंद्रपूर आणि गडचिरोली येथील दारू बंदी हटवण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.
गडचिरोली दारूबंदीचा इतिहास
गडचिरोली जिल्ह्यात डॉ अभय बंग यांनी 1988 ते 1993 पाच वर्षे दारू मुक्ती आंदोलन केले. 1993 मध्ये शासनाने दारूबंदी लागू केली. दारू बंदी लागू झाली मात्र कालांतराने याचे दुष्परिणाम दिसू लागले आणि अवैध दारूच्या धंद्याला चालना मिळू लागली. अनेक लोक या व्यवसायात सामिल झालेत. कमी वेळात जास्त पैसा कमवण्याचा हा सोपा उपाय होता. जिल्ह्याच्या सीमेवर एक नजर टाकली तर उत्तरेस भंडारा, नागपूर जिल्हा तर दक्षिणेस तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यांची सीमा आहे. उत्तर गडचिरोली जिल्ह्यातील लोकांना भंडारा नागपूर जिल्ह्यातून अवैध पद्धतीने दारू आणता येते मात्र या सीमेवर पोलीस नाके असल्याने काही वेळेस शक्य नसते, मात्र दक्षिण भागात अवैध पद्धतीने दारू सहज उपलब्ध होते. ह्या तेलंगणा सीमेवर प्राणहिता व गोदावरी नदी येतात त्यामुळे दारू तस्कर बोटीच्या साह्याने सीमा पार करून सहज दारू आणू शकतात आणि या सीमेवर पोलिसांची कायमस्वरूपी कुठेही चेकपोस्ट नाही कारण आहे दक्षिण गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त आहे. त्यामुळे नक्षल्यांचा धोका अधिक असतो त्यामुळे पोलीस चेक पोस्ट कायमस्वरूपी शक्य नाही आणि याचाच फायदा दारू तस्कर घेतात. ह्या तस्करीमुळे फायदा हा शेजारच्या तेलंगणा आणि छत्तीसगढ राज्याना मिळत आहे. या राज्यांच्या महसूलात सातत्याने वाढ होत आहे.
Chandrapur Liquor Ban | चंद्रपूर-गडचिरोतील दारुबंदी उठवण्याबाबत मुंबईत बैठक