बीड : घरातील वाद आणि पती चारित्र्यावर संशय घेत असल्याने तणावात असलेल्या एका निर्दयी मातेने आपल्या पोटच्या दोन मुलींना हौदात बुडवून मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दीपाली राधेश्याम आमटे (23) असे या निर्दयी मातेचे नाव आहे. ही घटना बीड शहरातील नरसोबानगर भागात आज सकाळी उघडकीस आली. या घटनेने खळबळ उडाली आहे. एक 3 वर्षांची मुलगी आणि एक 4 महिन्यांची मुलगी आहे.

पती चारित्र्यावर संशय घेत असल्याने दीपालीने दोन मुलींना घरातील हौदात बुडवून मारले. या दुर्दैवी घटनेत एक 3 वर्षांची मुलगी आणि एक 3 महिन्यांची मुलगी मरण पावली आहे. मोठी मुलगी आजी आजोबांकडे गेल्यामुळे मोठी मुलगी सुदैवाने बचावली.

सोमवारी घरातील सर्व व्यक्ती बाहेर गेले होते, तर पती राधेश्याम रिक्षा घेऊन बाहेर गेला होता. रात्री घरी आल्यावर राधेश्यामला पत्नी आणि मुली दिसल्या नाहीत. त्यांनी शोध घेतला मात्र त्या मिळून आल्या नाहीत. अखेर त्याने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आणि घरी आला. सकाळी पाणी घेताना राधेश्यामला हौदात मुलींचे मृतदेह आढळून आले आणि हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांना माहिती दिल्यावर पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी भेट दिली. पोलिसांनी निर्दयी मातेला अटक केली आहे.