चंद्रपूर : बल्लारपूर शहरात विजेचा धक्का लागून मायलेकाचा मृत्यू झाला. छबूताई त्रिंबके आणि विनोद त्रिंबके अशी माय-लेकांची नावे आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहर आज एका दुर्दैवी घटनेने हळहळले. विवेकानंद वॉर्डातील त्रिंबके कुटुंबात 2 जून रोजी एक विवाह नियोजित होता. त्यासाठी घरात स्वच्छता आणि रंगाचे काम सुरु होते. त्यामुळे अर्थिंगच्या वायर अस्ताव्यस्त पसरल्या होत्या.

दुर्दैवाने या अर्थिंगमध्ये विद्युत करंट प्रवाहित झाला होता व याची काहीही कल्पना नसलेल्या छबूताई या भागात गेल्याने त्यांना विजेचा धक्का बसला. त्या जमिनीवर पडून तोंडातून रक्त येत असल्याचे लक्षात येताच मदतीसाठी त्यांचा मुलगा विनोद धावला. मात्र, या दोघांनाही विजेचा जबर झटका बसला.

घरातील इतरांना हा प्रकार लक्षात येताच एकच कल्लोळ झाला. वीज प्रवाह थांबवून दोघानांही बल्लारपूर रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र, दरम्यान दोघांचाही मृत्यू झाला होता. 2 जून रोजी लग्न नियोजित असताना माय-लेकाचा झालेला अंत बल्लारपूर शहराला चटका लावून गेला.

दरम्यान, बल्लारपूर पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून पोलिस तपास सुरु आहे. लग्नाच्या निमित्ताने त्रिंबके कुटुंबात असलेला आनंद काही क्षणातच काळाने हिरावून घेतल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.