नाशिकचे पालकत्व स्वीकारलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नाशिककरांना लवकरच मेट्रोचं गिफ्ट मिळणार आहे. मंत्रभूमी असणारी नाशिकनगरी मेट्रोसिटी म्हणून ओळखली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर भाजप सरकारने आगामी विधानसभा निवडणुकांकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याकडे राज्य सरकारचा कल दिसत आहे.
नाशिक महापालिकाची सत्ता हाती घेतल्यानंतर पुणे-नागपूर पाठोपाठ नशिकमध्ये मेट्रो धावेल, असं आश्वासन मुख्यमंत्रीनी दिलं होतं. त्या दृष्टीने व्यवहार्यता तपासणी पूर्ण झाली. डीपीआर बनवण्याचं काम सुरु आहे. 31.40 किलोमीटरच्या पहिल्या टप्पात मेट्रो धावणार आहे.
परंतु ही मेट्रो रेल्वे नसून टायर बेस मेट्रो म्हणजेच आर्टिक्युलेटेड बस असेल. बॅटरीवर चालणाऱ्या दोन बस एकमेकांना जोडलेल्या असतील. रॅपिड ट्रान्झिट सिस्टम प्रणालीद्वारे ही सेवा कार्यरत होणार आहे. सुरुवातीला दोन मार्गांवर मेट्रो धावणार आहे.
‘दिल्ली मेट्रो आणि बसमध्ये महिलांना मोफत प्रवास’, दिल्ली विधानसभेच्या तोंडावर अरविंद केजरीवालांचा निर्णय
कोणत्या मार्गावर मेट्रो धावणार?
सातपूरमधील श्रमिकनगर ते खडकाली सिग्नल, सारडा सर्कल, द्वारका चौक ते नाशिकरोड असा एक मार्ग राहणार आहे. सातपूर रोडवरील अमृत गार्डन चौकात या मार्गावरील मुख्य जंक्शन असणार आहे. तर दुसरा मार्ग मुंबईनाका, सीबीएस अशोक स्तंभ ते गंगापूर गाव असा असणार आहे. मुंबईनाकावर दुसरे जंक्शन असणार आहे.
या दोन्ही मार्गांना जोडणारा लूप बरदान फाटा ते श्रमिकनगर या दरम्यान असणार आहे. दोन्ही मार्ग मिळून 29 थांबे असणार आहेत. PHPDT अर्थात ‘पॅसेंजर अवर पर डायरेक्शन ट्रान्सपोर्ट’ या तत्वानुसार या दोन्ही मार्गांची निवड करण्यात आली आहे. दोन्ही मार्गांवर PHPDT आठ हजार आहे. हे प्रमाण साधारणपणे 20 हजार असतं, तर मेट्रो रेल्वे सुरु करता आली असती. मात्र सध्या टायर बेस मेट्रोवरच नाशिककरांना समाधान मानावं लागणार आहे.
या दोन्ही मार्गांव्यतिरिक्त 24 फिडर रुटचा अवलंब केला जाणार आहे. त्यात रविवार कारंजा, पंचवटी कारंजा अशा जुन्या नाशिकमधून पुढे नांदूर नाकाकडे बसेस धावू शकतील.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मेट्रोची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. विरोधकांनी मात्र आतापासूनच टीका करायला सुरुवात केली आहे. नाशिककरांना मेट्रो रेल्वेचं स्वप्न दाखवण्यात आलं होतं. प्रत्यक्षात मात्र बस धावणार असल्यानं भाजप सरकार नाशिककरांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला जात आहे. नाशिक महापालिकेच्या माध्यमातून बससेवा सुरु केली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मनपा परिवहन सेवेसाठी 400 बसेस खरेदी केल्या जाणर आहेत. त्यातूनच मेट्रोसाठी एसी बस वापरल्या जातील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
नाशिक महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. शहरात तीन आमदार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतल्याचं वक्तव्य केल्यानंतर सुरुवातीपासूनच भाजपला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले जाता आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्याचा ट्रेलर बघायला मिळाल्याने विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना भाजपला विकासकामे दाखवण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठीच हा खटाटोप सुरु असल्याची शहरात चर्चा आहे. कारण काही असो नाशिकचा विकास होणं महत्त्वाचं.