शिर्डी : शिर्डीमध्ये तीन दिवसीय रामनवमी उत्सव काळात आलेल्या साईभक्तांनी साईबाबांच्या चरणी भरभरुन दान दिलं आहे. रामनवमी उत्सवाच्या चार दिवसात साई भक्तांनी एकूण चार कोटी 16 लाखांची देणगी साईचरणी अर्पण केली आहे. 12 ते 15 एप्रिल दरम्यान झालेल्या दानाची आज मोजदाद करण्यात आली.


शिर्डीत रामनवमी उत्सव तीन दिवस साजरा करण्यात येतो. या उत्सव काळात लाखो भाविक देशभरातून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. यावर्षीही लाखो भाविकांनी शिर्डीमध्ये हजेरी लावली. शिर्डीच्या साईबाबांच्या दानपेटीमध्ये भाविकांनी 1 कोटी 92 लाख दान केलं. तर डोनेशन काउंटरवर 98 लाख , क्रेडिड कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक आणि मनीऑर्डरच्या माध्यमातून 1 कोटी 11 लाख रुपये जमा झाले.


तर 7 लाख 61 हजारांचे सोने, 1लाख 11 हजाराची चांदी आणि 14 देशांचे पाच लाखांचे चलन असे एकंदरीत 4 कोटी 16 लाख रुपयांची देणगी साईचरणी अर्पण करण्यात आली आहे. रामनवमी उत्सव काळाता साईसंस्थानने आलेल्या भक्तांना मोफत बुंदी प्रसादाचे वाटप, भोजन व्यवस्था, निवासव्यवस्था यासह सुरक्षेची विशेष काळजी घेत उत्सवाचे योग्य नियोजन केले होते.