नवी दिल्ली : राज्यसभा उपसभापतीपदासाठी उमेदवार न देण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने घेतला आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी रणनीती ठरवण्यासाठी विरोधकांची बैठक झाली. यामध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.


राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी 123 मतांची गरज आहे. भाजप 69 जागांसह सभागृहात सर्वात मोठा पक्ष असा असला तरी एनडीएचा आकडा बहुमतापासून दूर आहे.

आपले काही मित्र पक्ष आणि काही अपक्ष अशी जोडतोड करून 115 पर्यंत भाजपचा आकडा पोहोचतो. पण 13 खासदार असलेली एआयडीएएमके कुठल्या बाजूने मतदान करेल हे अजून निश्चित नाही.

उपसभापतीपदाची निवडणूक ही विरोधकांच्या एकीची परीक्षा घेणारी आहे. भाजपला नमवण्याची संधी असल्याने सगळे विरोधक राज्यसभेत एकत्र येणार का याची उत्सुकता आहे.

सर्वात मोठा पक्ष असूनही विजयाची खात्री नसल्याने भाजप आपला उमेदवार देत नाही. मित्रपक्षांना सोबत ठेवण्यासाठी भाजपही सर्वसहमतीने उमेदवार निवडण्याचा प्रयत्न करत आहे.

एनडीएकडून अकाली दलच्या नरेश गुजराल यांचंही नाव चर्चेत आहे. तर राष्ट्रवादीचा उमेदवार असल्यास शिवसेनाही विरोधकांसोबत येऊ शकते, अशी अपेक्षा विरोधकांना आहे.

घटनेतील कलम 89 (2) नुसार राज्यसभेचं उपसभापतीपद जास्त काळ खाली ठेवलं जाऊ शकत नाही. त्यामुळे पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी एनडीए आणि विरोधकांकडून उमेदवार देण्याच्या हालचालींना वेग आला आहे.