नागपूर : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रत्नाकर गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावे 5 हजार 500 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे हे महाराष्ट्राचे छोटे नीरव मोदी असल्याचंही ते म्हणाले.


"रत्नाकर गुट्टेंनी कोट्यवधी रुपये बुडवले. गुट्टेंनी शेतकऱ्यांची फसवणूक करुन शेकडो शेल कंपन्यांची स्थापना केली. 23 बनावट कंपन्या तयार करुन शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेतलं आणि हे प्रकरण दाबण्यासाठी शेतकऱ्यांना धमकावलं, तसंच दमदाटीही केली," असा दावा धनंजय मुंडे यांनी केला.

"रत्नाकर गुट्टेने नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नावे हे कर्ज उचललं, त्यात एका शेतकऱ्याच्या नावे 40 ते 50 लाख उचललं. इतकंच नाही तर न्यायमूर्तींच्या मयत भावाच्या नावानेही बनावट कर्ज घेतलं. देशातील एकाही बँकेला त्यांनी सोडलं नाही," असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

"एकीकडे डीएसके यांच्यावर कारवाई होऊन अटक झाली. गुंतवणूकदारांनी सहमतीने पैसे गुंतवले, तिथे पोलिस लगेच कारवाई करतात. मात्र इथे 25,000 शेतकरी आहेत. इथे मात्र गुन्हा नोंदवूनही सुद्धा कारवाई केली जात नाही. रत्नाकर गुट्टे मोकाट का?" असा प्रश्नही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

कोण आहेत रत्नाकर गुट्टे?

रत्नाकर गुट्टे परळी तालुक्यातल्या दैठणाघाटचे रहिवाशी. परळीच्या थर्मल प्लाँटवर मजूर म्हणून काम करत होते. थर्मल स्टेशनमधली छोटी मोठी कामं घ्यायला सुरुवात केली. तिथून पुढे गुट्टे मोठे कंत्राटदार झाले. सुनील हायटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या या कंपनीच्या माध्यमातून गुट्टेंनी देशभरात अनेक वीज प्रकल्पांची कामं केली आहेत.

रत्नाकर गुट्टे हे अजित पवारांचे निकटवर्तीय होते. गंगाखेड शुगर या कारखान्याचा शुभारंभही शरद पवार यांनी केला होता. रत्नाकर गुट्टेंच्या पत्नी सुधामती गुट्टे या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सरचिटणीस होत्या.

सध्या रत्नाकर गुट्टे पंकजा मुंडे यांच्या जवळचे मानले जात असले तरी गुट्टे सध्या महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षात आहेत. मागची विधानसभा गुट्टेनी जानकरांच्या पक्षातर्फे लढली आहे.